भयंकर:-सोसाट्याचा वारा,कोसळणाऱ्या धारा मंगळवेढ्यासह दक्षिण भागात मोठा फटका,घरावरील पत्रे उडाले,झाडे व वीजेचे पोल उन्मळून पडले..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, May 26, 2024

भयंकर:-सोसाट्याचा वारा,कोसळणाऱ्या धारा मंगळवेढ्यासह दक्षिण भागात मोठा फटका,घरावरील पत्रे उडाले,झाडे व वीजेचे पोल उन्मळून पडले.....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागाला अक्षरश: वादळी वार्‍याने अक्राळविक्राळ स्वरुपात झोडपल्याने अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने कुटूंबांचे संसार उघड्यावर आले असून जनावरांसाठी कडब्याच्या ढेपनी वाऱ्याच्या वेगाने सगळ्या रानातून कडबा इस्कटला गेला आहे.काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने मार्गात अडथळे निर्माण झाले. तसेच आंबा,केळीच्या बागा वादळाने उध्वस्त झाल्या. वीज वितरण कंपनीचे अनेक ठिकाणी पोल ही मोडून पडल्याचे चित्र आहे.
रविवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान अचानक वादळी वारे अक्राळ विक्राळ रूप धारण करीत सुटल्याने ग्रामीण भागात अक्षरश: या वादळाने थैमान घातले मरवडे,पाठखळ,ब्रम्हपुरी,माचणूर,हुलजंती,शिरसी, भोसे, मारापूर, अकोला,घरनिकी, भाळवणी, खोमनाळ,उचेठाण यांच्यासह अनेक गावात घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या वादळी वार्‍यामुळे शेतातील व रस्त्याच्या कडेला असलेली जुनी व मोठाली झाडे उन्मळून पडली आहेत. पाटखळ-मंगळवेढा मार्गावर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने नागरिकांना ये-जा करणेही मुश्किल बनले होते. पर्यायी मार्ग काढून त्यांना आपले घर गाठण्याची वेळ आली. वादळी वार्‍याने अनेक ठिकाणचे वीज वितरण कंपनीचे पोल तुटून पडल्याचे चित्र आहे.
मंगळवेढा दक्षिण भागात घरावरील पत्रे तसेच कडब्याच्या ढेपनी वाऱ्याच्या वेगाने सगळ्या रानातून कडबा इस्कटला गेला आहे. केळीच्या बागाही वार्‍याच्या वेगाने झोपलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. वादळी वारे मोठ्या प्रमाणात असल्याने पावसाचे प्रमाण कमी होते. आकाशात काळेकुट्ट ढग येवून विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिक भीतीपोटी धांदलीने घर गाठण्याच्या प्रयत्नात होते. हा सर्व निसर्गाचा अक्राळविक्राळपणा रेमल वादळाचा परिणाम असल्याचे शेतकरी व नागरीकामधून बोलले जात आहे. गेले दोन दिवस प्रचंड वादळ सुटत असल्याने नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत.दरम्यान वादळाने झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करुन शेतकरी व नागरिकांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

Pages