धक्कादायक:- खुपसंगी पटेल वस्ती जि.प.शाळेतील 19 मुलांनी जंगली एरंडीच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 5, 2023

धक्कादायक:- खुपसंगी पटेल वस्ती जि.प.शाळेतील 19 मुलांनी जंगली एरंडीच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा....

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय व सोलापूर सिव्हील येथे उपचारासाठी दाखल
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील पटेल वस्ती जि.प.शाळेतील 19 मुलांनी जंगली एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना उलटी,मळमळ होवू लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय तसेच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे पालक वर्गातून भितीचे वातावरण निर्माण झाले असून पालक रुग्णालयात तळ ठोकून आहेत.
या घटनेची हकीकत अशी,खुपसंगी पटेल वस्ती जि.प.शाळेतील 19 विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शो साठी लावलेली जंगली एरंडीच्या झाडांच्या पडलेल्या बिया सुरुवातीला काही मुलांनी खाल्ल्याने त्याचे पाहून अन्य मुलांनीही खाल्ल्या. दुपारी 12 वाजता या मुलांनी पोटात मळमळ व चक्कर येत असल्याची तक्रार प्रभारी मुख्याध्यापक बाबुराव माळी यांच्याकडे केल्यावर त्यांनी या सर्व मुलांना खाजगी वाहनातून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील डॉ.सुलोचना जानकर,मेडिकल ऑफिसर मंजूषा केंदुळे यांनी या मुलांची तपासणी करुन सहा मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन घेतले तर उर्वरीत 13 मुलांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील मुलांना सलाईनमधून उलटी व मळमळ थांबण्याचे औषध देण्यात आल्याने या मुलांच्या प्रकृतीत रात्री उशीरा सुधारणा झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सोलापूर येथील मुलांचीही प्रकृती सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेमुळे पालक वर्ग धास्तावला असून ग्रामीण रुग्णालयात मुलांच्या काळजीने पालक रात्री उशीरापर्यंत थांबून होते. ही सर्व मुले पहिली व दुसरीच्या वर्गातील आहेत.
शाळा भरण्यापुर्वी शाळेजवळ लावलेल्या शोच्या झाडाच्या जंगली एरंडीच्या बिया मुलांनी खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ व चक्कर येण्याचा प्रकार होवू लागल्याने तात्काळ मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. -बाबुराव माळी,मुख्याध्यापक जि.प.पटेल वस्ती खुपसंगी

Pages