मंगळवेढा पोलीसांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाई ! 1 कोटी 25 लाख 92 हजाराचा मुद्देमाल केला जप्त..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, July 31, 2023

मंगळवेढा पोलीसांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाई ! 1 कोटी 25 लाख 92 हजाराचा मुद्देमाल केला जप्त.....

अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले! विविध गुन्ह्यात 178 आरोपींना केले गजाआड
मंगळवेढा /प्रतिनिधी
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत चालणार्‍या विविध अवैध धंद्याविरुध्द प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी पोलीस पथकाव्दारे छापे टाकून 56 गुन्हे नोंदवून 178 आरोपींना गजाआड करीत 1 कोटी 25 लाख 92 हजार 329 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंगळवेढा पोलीस ठाणेच्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी कार्यभार घेतल्यानंतर अवैध धंद्याविरुध्द कारवाईची मोहिम कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सुनिल फुलारी तसेच पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव,डी.वाय.एस.पी. विक्रम गायकवाड आदींच्या मार्गदर्शनाखाली दि.1 ते 31 जुलै अखेर मोहिम राबवून बेकायदा वाळू उपसा प्रकरणात 11 गुन्हे दाखल करुन 18 आरोपींवर कारवाई करीत 73 लाख 53 हजार इतका मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैध गुटखा प्रकरणात तिघांविरुध्द गुन्हे दाखल करुन तीन आरोपींना ताब्यात घेवून 26 हजार 783 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुगार,गांजा व विस्फोटके आदी घटनेत 14 जणाविरुध्द गुन्हे दाखल करुन 111 आरोपी गजाआड करीत 36 लाख 11 हजार 451 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
विविध बेकायदा दारु धंद्यावर पोलीसांनी 42 जणाविरुध्द गुन्हे दाखल करुन 46 जणांना ताब्यात घेवून 16 लाख 1 हजार 95 असा मुद्देमाल जप्त केला.या विविध कारवाईत 178 आरोपींना गजाआड करुन 1 कोटी 25 लाख 92 हजार 329 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. दरम्यान ही कारवाई मंगळवेढा तालुक्यातील सजग नागरिकांच्या सहकार्यामुळेच कारवाई करणे शक्य झाली असल्याची भावना साटम यांनी प्रसारमाध्यमाजवळ व्यक्त केली आहे. यापुढेही कारवाईची मोहिम सुरु राहणार असल्याचे त्यांनी मिडीयाला आश्वासन दिले. दरम्यान सुज्ञ नागरिकांनी कुठे अवैध धंदे सुरु असल्यास त्यांनी पोलीस प्रशासनास कळवून कारवाईस सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Pages