सांगोला शहरातील सिंगल फेजचे काम व विद्यानगर, यशनगर व वाड्यावस्त्यावरील रस्ते, डांबरी रस्ते पूर्ण न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन :- सतीशभाऊ सावंत - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, May 24, 2023

सांगोला शहरातील सिंगल फेजचे काम व विद्यानगर, यशनगर व वाड्यावस्त्यावरील रस्ते, डांबरी रस्ते पूर्ण न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन :- सतीशभाऊ सावंत

सांगोला/प्रतिनिधी
सांगोला शहरातील सर्व वाड्या वस्त्यांवरील सिंगल फेजचे नवीन ट्रान्सफार्मर बसवून विद्युतपुरवठा सुरळीत करावा त्याचबरोबर सांगोला शहरातील विद्यानगर, यशनगर वसाहतीसह वाड्यावस्त्यावरील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावे या मागणीसाठी माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांच्या नेतृत्वाखाली मिरज-पंढरपूर हायवेवर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ही सर्व कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी नागरिकांसमोर अधिकाऱ्यांना दिला आहे.
सांगोला शहरातील पंढरपूर रोड, रेल्वे लाईन पश्चिमेस जानकर वस्ती, पांडुरंग माने वस्ती, जांगळे वस्ती, पवार वस्ती, राजू ढोले वस्ती, अनिरुद्ध पुजारी वस्ती, दगडू जानकर वस्ती, नाथा सरगर वस्ती, साळुंखे वस्ती, पवार-काटकर वस्ती, गावडे वस्ती हा भाग शहरात आहे परंतु या भागात ग्रामीण प्रमाणे विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे या भागात सिंगल फेजचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत. तसेच सांगोला शहरातील विद्यानगर, यशनगर वसाहत, पवार-कटकर वस्ती, पंढरपूर रोड बाळासाहेब बनसोडे घर ते विशाल देशमुख घर, जांगळे वस्ती, साळुंखे वस्ती, आनंदनगर या भागातील सर्व रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत या मागणीसाठी माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी मिरज-पंढरपूर हायवेवर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बापूसाहेब ठोकळे, प्रा.दिलीप नष्टे, चारुशीला बाबर मॅडम यांनी शहरातील अडीअडचणी व विविध मागण्या केल्या.
यावेळी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमित शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी या मागण्या तात्काळ पूर्ण करून रस्ते डांबरीकरण व सिंगल फेजचे ट्रान्सफार्मर बसवून शहरात विद्युत पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन आंदोलकांसमोर दिले.
यावेळी सर्व मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास यापुढे याहीपेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी आंदोलकांच्यावतीने अधिकाऱ्यांना दिला. यावेळी रस्ता रोकोला शहर व परिसरातील शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस हवालदार आप्पासो पवार यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केला. रास्ता रोको आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Pages