मंगळवेढा पोलिसांची कामगिरी,माण नदीच्या काठावर हातभट्टी दारु काढणार्‍या ठिकाणी पोलीसांचा छापा.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 11, 2023

मंगळवेढा पोलिसांची कामगिरी,माण नदीच्या काठावर हातभट्टी दारु काढणार्‍या ठिकाणी पोलीसांचा छापा....

एका अल्पवयीन मुलासह पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल..... चौघे पोलीसांच्या ताब्यात...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील माण नदीच्या काठावर बेकायदा हातभट्टी दारु काढण्याच्या ठिकाणी नुतन डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी छापा टाकून दारु व वाहने असा एकूण 5 लाख 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पाच जणांविरुध्द गुन्हे नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईमुळे दारु काढणार्‍यामध्ये खळबळ उडाली असून पोलीसांनी ढाब्यावरुन खुलेआम होणारी बेकायदा दारु विक्रीवर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ व सुज्ञ नागरिकामधून पुढे येत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, उचेठाण येथील माण नदीच्या काठी जगताप वस्तीवर अक्षय बनसोडे यांचे शेताच्या बाजूस अवैधरित्या हातभट्टी दारु काढत असल्याची माहिती डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड व पो.नि.रणजित माने यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, बोराळे बीटचे हवालदार महेश कोळी, पोलीस नाईक मल्लिकार्जुन विभुते यांच्यासह पथकाने सदर ठिकाणी दि.9 रोजी रात्री 10.30 वाजता छापा टाकला असता आरोपी रणजित गायकवाड (रा.सोनके), पंकज जाधव (कासेगाव), तानाजी सलगर (सोनके),सारंग भोसले (सोनके) हे विद्युत प्रकाशात प्लास्टीकच्या बॅरलमध्ये लाकडाने काही तरी ढवळत असल्याचे दिसले. पोलीसांनी याबाबत त्यांना विचारणा केली असता गावठी दारु बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीसांनी पंचनामा करुन 22 हजार 500 रुपये किंमतीची 300 लिटर क्षमतेचे तीन प्लास्टिक बॅरल मध्ये 900 लिटर दारु, 25 हजार रुपये किंमतीचे इतर साहित्य, 350 रुपये 10 किलोग्रॅम किंमतीचे नवसागर, 4 लाख रुपये किंमतीची फियाट कंपनीची कार,60 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा असा एकूण 5 लाख 78 हजार 50 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील सर्व लोक हे बाहेरच्या तालुक्यातील असून गेल्या पाच दिवसापासून दारुचे उत्पादन सुरु केल्याची माहिती मिळत असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील दारु,हातभट्ट्या समुळ नष्ट करुन त्यांना अन्य उद्योग निर्माण करुन देवून त्यांच्या जीवनाचे परिवर्तन केल्याने सातपुते यांना देशपातळीवरचा पुरस्कारही परवा मिळाला आहे. दरम्यान नुतन डी.वायएस.पी. विक्रांत गायकवाड यांनी हातभट्टी उध्वस्त केल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त होत असले तरी जेवणाचे फलक लावून खुलेआम दारु विक्री करणार्‍या ढाब्यावर केव्हां कारवाई होणार? असा सवाल सुज्ञ नागरिकामधून करुन मंगळवेढा तालुका दारुमुक्त करावा अशी मागणी पुढे येत आहे.

Pages