मंगळवेढ्यात पोलीस प्रशासन व राजकीय पक्ष यांच्यात वादाची धुसफूस सुरुच.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 22, 2023

मंगळवेढ्यात पोलीस प्रशासन व राजकीय पक्ष यांच्यात वादाची धुसफूस सुरुच....

कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी लक्ष घालून वाद संपुष्टात आणावा अशी मंगळवेढेकरांची होतेय मागणी.......!
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढ्यात पोलीस प्रशासन व राजकीय पक्ष असा अंतर्गत वाद गेल्या 21 दिवसापासून धुसफुसत असल्याने हा वाद विकोपाला जावून कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविली जात असल्याने कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या कामी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या वादावर तोडगा काढावा अशी मंगळवेढेकरांची मागणी होत आहे. परप्रांतीय बालकाचे झालेले अपहरण,पडोळकरवाडी येथे दरोडखोरांनी वृध्देचा केलेला खून,मंगळवेढ्यात वाढणारे अवैध धंदे व अवैध धंदेवाल्याकडून होत असलेली हप्तेवसूली, पोलीस स्टेशन आवारातून सोडून दिलेले वाळूचे टिपर आदी घटनांवर अंकुश ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत राजकीय पक्षांनी दि.1 मे महाराष्ट्र दिनी अमरण उपोषण डी.वाय.एस.पी.कार्यालयासमोर करण्याचा इशारा दिला होता. यावर स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी चर्चेतून तोडगा काढून उपोषण स्थगित केले होते. दरम्यान यानंतरही पोलीस प्रशासन व राजकीय पक्षाचे लोक यांच्यात अंतर्गत खदखद सुरु असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असल्याने मंगळवेढ्यातील वातावरण गढूळ बनत चालले आहे.
मंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्ष व पोलीस प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे जाणकार व वयोवृध्दांकडून सांगण्यात येत असून यांचा वादच आम्ही पाहत बसायचा का? असा संतापजनक सवालही त्या वृध्द जाणकारांकडून केला जात आहे. हा वाद विरोधी पक्षापर्यंत जावून पोहचला आहे. दररोज एकमेकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप होत असताना मंगळवेढेकर यांच्या वादाला वैतागले आहेत. समाजामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधीत राखणे पोलीस प्रशासनाची महत्वाची भूमिका असून या वादाचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ दोघांवरही आली आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पोलीस प्रशासन व राजकीय पक्षांच्या लोकांना एकत्र बोलावून दोन्ही घटनांच्या मुळाशी जावून या घटनेतील सत्य जनतेसमोर आणून दूधाचे दूध, पाण्याचे पाणी करुन विकोपाला जात असलेला वाद समुळ थंड करावा अशी मागणी मंगळवेढेकरांमधून होत आहे.

Pages