चाैकशीत बडा मासा गळाला लागन्याची शक्यता....!
मंगळवेढा/प्रतिनिधी
सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र.166 मध्ये बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम 1 लाख 43 हजार 794 रुपये शेतकर्याला देण्यासाठी सात हजाराची लाचेची रक्कम घेवून फरार झालेला आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे अखेर तो लाचलुचपत पथकाला शरण आला आहे. दरम्यान पोलीसांनी त्याला अटक करुन पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी हे बाधीत शेतकरी असून कमलापूर हद्दीतील गट नं.52 मधून सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग केला आहे. सदर जमीनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधीत झाल्याने 1 लाख 43 हजार 794 रुपये इतकी मंजूर रक्कम झाली होती. ही रक्कम देण्यासाठी दलाल तथा झीरो कर्मचारी पंकज महादेव चव्हाण (रा.शेलेवाडी) याच्या मार्फत सात हजाराची लाच मागून ती स्वीकारुन लाचलुचपतच्या पथकाला पाहताच आरोपी सुरज नळे याने दि. 29 रोजी रात्री 10.15 वाजता फिल्मीस्टाईलने चार चाकी वाहनातून पलायन केले होते. पथकाने कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत पाठलाग केल्यानंतर आरोपीने गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता.
पोलीसांनी झीरो कर्मचार्याला यापुर्वीच अटक केली आहे. तलाठी आरोपीची गाडी ही पोलीसांनी जप्त केली होती. अखेर तलाठी आरोपी याने नांगी टाकत पथकाच्या समोर दि.1 एप्रिल रोजी हजर झाला. तपासीक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांनी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता आरोपी नळे यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रांत कार्यालय हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले असून बाधीत झालेल्या शेतकर्यांना मंजूर रक्कमा देण्यासाठी टक्केवारीत पैसे वसूल करुन शेतकर्यांचा छळ केला जात असल्याच्या यापुर्वी अनेक तक्रारी असतानाही जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केल्यानेच आजचा प्रसंग उद्भवला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाधीत शेतकर्यांकडून लाखो रुपयांच्या रक्कमा उखळल्या असल्याची खमंग चर्चा असून वरिष्ठ अधिकार्यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने करुन शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

गैरमार्गाने अमाप संपत्ती अधिकार्यांनी कमावल्यामुळे सीआयडी खात्यामार्फत चौकशी होवून संबंधीत अधिकार्यांना बडतर्फ करावे अशी मागणी सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे. यापुर्वी येथील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी शेतकर्यांनी तब्बल 28 दिवस उपोषण व महामार्गावर आंदोलन केले होते. एवढे करुनही जिल्हा प्रशासनाला जाग न आल्यामुळे भ्रष्टाचाराचा काळ सोकावला गेला असल्याचा आरोप जनतेमधून होत आहे. लाचलुचपतच्या पडलेल्या धाडीमुळे प्रांत कार्यालयात सन्नाटा पसरला असून यात बडे मासे ही अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.