ज्वारीला भाव चांगला येणे गरजेचे...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील काळ्या शिवारातील व मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील ज्वारी काढणीला वेग आला असून वातावरणाच्या बदलामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटणार आहे. ग्रामीण भागात हुरडा पार्टीचे प्रमाण दरवर्षीपेक्षा यावर्षी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
मंगळवेढा तालुक्यात या वर्षी सुमारे एक लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या 40 ते 45 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. जिरायती पट्ट्यातील रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला वेग आला आहे. ज्वारी पिकाची काढणी तशी अवघड मानली जाते. शेताला चांगले खतपाणी असले तर काढणीला त्रास होतो. रान कडक झाले असल्यास ज्वारीचे ताट उपटले जात नाही. त्यामुळे बोटे कापणे, फोड येणे,हाताला मुंग्या भरणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सध्या ज्वारी काढणीला सहजासहजी मजूर मिळत नाही. मजूर मिळाले तरी दिवसाला गड्याला पाचशे रुपये हजेरी आणि बायकांना तीनशे रुपये हाजरी प्रमाणे हजेरी द्यावी लागते हे सगळे करत असताना ज्वारी उत्पादनातून निघणारे उत्पन्न हे कमी असून अलिकडे इतर पिकाच्या तुलनेत ज्वारी पीक घेणे मोठे जिकीरीचे झाले आहे. बाजारभाव चांगला असला तरी ज्वारीची काढणी,पेंड्या बांधणे मळणी या गोष्टी अधिक कष्टाच्या झाल्या आहेत. मजूर मिळत नसले तरी मित्र मंडळी, नातेवाईक किंवा सावड करून ग्रामीण भागामध्ये ज्वारीची काढणी केली जाते.
मंगळवेढा तालुक्यातील व ग्रामीण भागातील मालदांडी या जातीच्या ज्वारी बियाणांची पेरणी या परिसरात शेतकरी करतात. जिरायत भागात अवकाळी पाऊसाच्या हजेरीने यंदा ज्वारी पीक जोमात येईल. असे वाटले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात ढगाळ वातावरण, धुके व सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे ज्वारी कणसात हवा तसा टपोरा दाणा भरला नाही. काही ठिकाणी या वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर झालेला पहावयास मिळतो. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे असले तरी ज्वारीच्या ताट जोमात आले असून कडबा चांगल्या प्रकारे निघणार आहे. त्यामुळे कडब्याला ही चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीला ज्वारीही पीक रोजगार आणि खर्चामुळे परवडणारे पीक नसून काढणीसाठी मोडण्यासाठी आणि पेंड्या बांधण्यासाठी येणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त होतो त्यामुळे ज्वारी पिक सोडून बरेचसे शेतकरी तुर हरभरा व करडई कडे वळलेली आहेत व मार्केट भाव ही चांगला येणे गरजेचे आहे.
शेतकरी
सुभाष श्रीधर बिले
Friday, February 10, 2023
