मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंचगाव येथील टोलनाक्यावर आज बुधवार रोजी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील अपुर्ण कामे पुर्ण करणे, पत्रकारांच्या गाड्यांना टोलमाफी देणे,20 कि.मी. अंतरावरील परिसरातील गाड्यांना टोल फ्री करणे, येथील मस्तवाल अधिकार्यावरती कारवाई करणे आदीबाबत जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने सुमारे 3 तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्याने हा परिसर दणाणून गेला होता. आंदोलना वेळी सोलापूरकडून व मंगळवेढ्याकडून येणार्या-जाणार्या गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र होते.

मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर इंचगाव येथे टोल वसूली नाका उभा करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढा,कचरेवाडी,ब्रम्हपुरी, बेगमपूर, सोहाळे, इंचगाव, वडदेगाव व या राष्ट्रीय महार्गावरील अन्य ठिकाणी बरीचशी कामे अर्धवट स्थितीत असून ते पुर्ण करण्याऐवजी संबंधीत ठेकेदार नागरिकांना सेवा देण्याऐवजी टोल वसूली चालू केली असल्याने याचा फटका वाहन चालक व नागरिक, शेतकरी यांना बसत असल्याने यांच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काँंग्रेस, प्रहार संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी 1.30 ते 3.30 या दरम्यान टोल नाकयावर बैठे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास 300 ते 400 आंदोलक सहभागी झाल्याने येथे जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने पोलीसांवर ताण आला होता.

आंदोलकांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते सुहास चिटणीस यांना वेळोवेळी निवेदन देवूनही त्या तक्रारीची दखल न घेता आंदोलकांना वेड्यात काढण्याचे काम केले असल्याचा आंदोलकाचा आरोप होता. या टोल नाक्यावरील मॅनेंजर हे येणार्या जाणार्या वाहन चालकांना मगरुरीची भाषा वापरत असल्याने या मस्तवाल मॅनेंजरला तात्काळ हलवा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी एकमुखी केली. संतापलेल्या आंदोलकांनी त्या मॅनेंजरच्या कार्यालयात घुसून श्रीमुखात भडकावण्याचाही प्रकार घडला. आंदोलन सुरु असतानाही टोलवाले टोल घेवून गाड्या सोडत असल्याने आंदोलक चांगलेच भडकले. यावेळी आंदोलक व टोलवाले यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याने वातावरण गंभीर बनले होते. मात्र उपस्थित पोलीसांनी परिस्थिती लक्षात घेवून वेळीच हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंते सुहास चिटणीस यांना आंदोलनस्थळी समोर बोलवून घ्या अन्यथा आंम्ही हटणार नाही असा पावित्रा घेतल्याने आंदोलनाची वेळ वाढत गेली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रतिनिधी म्हणून एक अभियंते उपस्थित होते. मात्र आंदोलकांनी चिटणीस यांनाच बोलवून घटनास्थळी घेण्याचा हट्ट धरल्याने उपस्थित त्या प्रतिनिधीला घेरावा घातल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. दरम्यान यावेळी आंदोलकांनी 20 कि.मी. परिसरात राहणार्या शेतकरी व नागरिक यांचे वाहन तसेच पत्रकारांच्या वाहनांना टोल माफ करावा त्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी कडक भूमिका घेतल्यानंतर उपस्थित अधिकार्यांनी याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे सांगितल्यावर तणावपूर्ण वातावरण निवळले. दोन दिवसात निर्णय न झाल्यास टोल नाक्याची तोडफोड करु याची सर्वस्वी जबाबदारी अभियंत्याची राहिल असा इशाराही जनहित संघटनेचे भैय्या देशमुख व शिवसेनेचे शरद कोळी यांनी दिला. टोल नाक्यावरील कर्मचार्यांना तुटपुंज्या पगारी दिल्या जात असून त्यांना वाढवून ऑनलाईन

पध्दतीने पगार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महामार्गावर अपघातामुळे कुटूंबकर्ते मयत झाल्याने त्यांना मदत मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलन प्रसंगी जि.प.सदस्या शैला गोडसे, शिवसेनेचे शरद कोळी, काँग्रेसचे सुलेमान तांबोळी, चंद्रकांत निकम, किशोर दत्तू, शिवाजी जाधव, महेश जाधव, गोपाळ पवार, राजेंद्र आसबे, पिंटू पवार, गोपीनाथ वराडे, शिवाजी सुतार, बच्चन भोई, दामाजी मोरे, सर्जेराव गाडे, निसार पटेल, संदिप पाटील, पृथ्वीराज भोसले, महेश बिसकुटे,आप्पा भोई यांच्यासह बेगमपूर,ब्रम्हपुरी, माचणूर, इंचगाव, सोहाळे,कामती आदी गावातील शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
टोल नाक्यावरील मस्तवाल मॅनेंजरला आंदोलकांनी त्याच्या कार्यालयात घुसून श्रीमुखात भडकावली. आंदोलन सुुरु असतानाही तो मॅनेंजर वाहने सोडून टोल वसूली करीत असल्याचा आरोप होता. त्या मॅनेंजरची तात्काळ तेथून उचलबांगडी करावी अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा दिला इशारा.
20 गावच्या नागरिक व शेतकरी,पत्रकार आदींच्या गाड्यांना टोल माफी द्यावी, येथील कर्मचार्यांना पुरेशा प्रमाणात वेतन द्यावे. महामार्गावरील अपूर्ण कामे पुर्ण करुनच टोल सुरु करावा. सध्या घेण्यात येणारा टोल हा बेकायदेशीर असून या बाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भैय्या देशमुख यांनी दिला. प्रथमच तीन तास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन झाले आहे. आंदोलना दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.