मंगळवेढा...त्या बालकाच्या शोधासाठी छत्तीसगड व कर्नाटक या दोन राज्यात पोलिसांचा कसून शोध..... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, December 8, 2022

मंगळवेढा...त्या बालकाच्या शोधासाठी छत्तीसगड व कर्नाटक या दोन राज्यात पोलिसांचा कसून शोध.....

मंगळवेढा/प्रतिनिधी
शहरातील एम आय डी सी परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय बालकाच्या शोधासाठी मंगळवेढा पोलिसांच्या दोन पथकांनी छत्तीसगडमध्ये नातेवाईकांकडे कसून चौकशी केली. तर कर्नाटकमध्येही विविध ठिकाणी जावून त्याचा शोध घेण्यात आला.मात्र तो आजघडीला तरी मिळून आला नसल्याचे सांगण्यात आले.दरम्यान,दोन्ही राज्यामध्ये बसस्थानक,रेल्वे स्टेशन,पोलिस स्टेशन येथे त्या बालकाचे पोस्टर्स लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.00 वा.एम आय डी सी परिसरातून रणवीरकुमार साहू(वय 4 वर्षे रा.छत्तीसगड) याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे.या घटनेला जवळपास 18 दिवस उलटून गेले असून पोलिस यंत्रणा घटनेच्या पहिल्या दिवसापासून चोहोबाजूने तपास करण्यात मग्न आहे.दरम्यान पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी खुद्द छत्तीसगड राज्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे यांचे पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
सदर ठिकाणी या पथकाने जिल्हयाचे पोलिस अधिक्षक यांना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण जिल्हयातील पोलिस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली.डी.जी.कंट्रोल रायपूर येथे भेट देवून त्यांनी संपूर्ण राज्यामध्येही अपहरणकर्त्या मुलाविषयी कळविण्यात आले.जिल्हाधिकार्‍यांनाही भेटून मुलाच्या अपहरणाबाबत माहिती देण्यात आली.अपहरणकर्त्या मुलाचे नातेवाईक यांचेकडे कसून चौकशी करून या कुटुंबाची कुणाशी दुष्मनी व संपत्तीविषयी वाद आहे का? आदीबाबत चौकशी करण्यात आली.तसेच या पथकाने गावचे सरपंच,कोतवाल यांना भेटून या मुलाचे पोस्टर्स देवून सदर ठिकाणी डकवून कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी अथवा तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले.दुसरे पथक सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे यांचे कर्नाटक राज्यातील इंडी, चडचण, अथणी, विजापूर,अफजलपूर,गाणगापूर आदी ठिकाणी भेटी देवून मुलाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली.या पथकाने रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात मुलाचे फोटो डकवून नागरिकांना पोस्टरमधील मुलगा नजरेस आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.
मुलाचे अपहरण केल्यापासून मंगळवेढा पोलिस रात्रीचा दिवस करून शोध घेत आहेत मात्र त्यास अदयापही यश मिळत नसल्यामुळे पोलिस यंत्रणा गंभीर होवू पहात आहे.आत्तापर्यंत पोलिसांनी श्वान पथक,नातेवाईकांचे हातांचे ठसे,माण व भिमा नदीत शोध घेतला.विविध 9 पथकाव्दारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा,जिल्हयातील 6 डि.वाय.एस.पी.कार्यालयातील तज्ञ पोलिस कर्मचारी आदींच्या माध्यमातूनही सातत्याने तपास सुरु आहे.छत्तीसडमध्ये अपहरणकर्त्या मुलाच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी करताना सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे छायाचित्रात दिसत आहेत.

Pages