मंगळवेढा शहरातून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅव्हल्सने पायी चालत जाणार्‍या तरूणास चिरडले.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 6, 2022

मंगळवेढा शहरातून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅव्हल्सने पायी चालत जाणार्‍या तरूणास चिरडले....

नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे जाताहेत अनेकांचे बळी,नागरिकांतून संताप चालकाविरूध्द गुन्हा दाखल .... दिव्य न्यूज नेटवर्क मंगळवेढा शहरातून भरधाव वेगाने जाणार्‍या लक्झरी बसने पायी चालत जाणार्‍या 34 वर्षीय तरूणास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लक्झरी चालक प्रल्हाद रामपाल चौधरी (वय 47 रा.राजस्थान) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून रेवणसिध्द शिवाजी मोटे (रा.नंदेश्‍वर) असे अपघातात मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.मंगळवेढा शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याची मागील दोन वर्षापासून ज्येष्ठ नागरिक व शहरवासीयांची मागणी असताना नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासन एकमेकावर ढकलून अपघातांना आमंत्रण देत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया आज दिवसभर नागरिकांमधून उमटत होती. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत रेवणसिध्द मोटे हा सकाळी 9.00 वा. नंदेश्‍वर येथून मंगळवेढयात काम असल्याने तो आला होता.तो जुन्या पोलिस चौकीजवळील राजयोग हॉटेलसमोरून दामाजी पुतळयाकडे पायी चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आर.जे.27,पी.सी.1003 या क्रमांकाच्या ट्रॅव्हर्ल्सने जोराची धडक दिल्याने सदर तरूण हा रस्त्यावर पडला व ट्रॅव्हर्ल्सचे चाक त्या तरूणाच्या डोक्यावरून गेल्याने डोके पुर्णपणे चेंदामेंदा होवून तो जागीच मयत झाला असल्याचे मयताचा भाऊ हरिदास मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. मंगळवेढा शहरातून विजापूर -पंढरपूर हा राष्ट्रीय सिमेंटचा महामार्ग गेल्याने अवजड वाहने सुसाट वेगाने जातात.परिणामी वारंवार अपघात होवून मृत्यूच्या आकडयात वाढ होत आहे. पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर मंगळवेढयातील पहिल्या भेटीप्रसंगी पत्रकारांनी शहरातून जाणारी अवजड वाहतूक बाह्य मार्गाने वळवून जाणारे जीव वाचवावेत अशी मागणी केली होती. यावर सातपुते यांनी तत्कालीन पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांना तात्काळ अवजड वाहतूक बंद करण्याच्या सक्त सुचना देवूनही वरिष्ठांच्या आदेशाकडे गेली दोन वर्षे प्रभारी पोलिस अधिकार्‍यांनी आत्तापर्यंत गांभिर्याने न पाहिल्यामुळे अपघाताची मालिका सुरु आहे.मागील गळीत हंगामात ऊसाच्या ट्रॅक्टरने शाळकरी मुलाचाही जीव घेतला होता.
दामाजी चौकात एका टेंपोने हॉटेलमध्ये काम करणार्‍या एका युवकाला धडक दिल्याने तोही मयत झाला होता. बोराळे नाक्यावर ट्रॅक्टरने महिला हॉस्पीटलमध्ये दवाखान्याला उपचारासाठी आलेला रुग्ण रस्ता ओलांडताना धडक दिल्याने तो जागीच मयत झाला. एवढया लोकांचे जीव जावूनही पोलिस प्रशासन म्हणते हे काम नगरपालिकेचे,तर नगरपालिका म्हणते हे काम पोलिस प्रशासनाचे. दोघांच्या तु तु मै मै च्या नादात अनेकांचे जीव नाहक बळी जात आहेत. हे तितकेच खरे आहे.आता तरी पोलिस प्रशासन व नगरपालिकेला शहाणपणा सुचेल का असा संतापजनक सवाल या अपघातानंतर दिवसभर शहरवासीयांमधून व्यक्त होत होता. सध्या शाळा कॉलेज सुरु असल्याने दामाजी चौकात मुला मुलींची प्रचंड गर्दी असते. तसेच नजीकच बसस्थानक असल्यामुळे प्रवाशांची आत जाणे व बाहेर येण्यासाठी धावपळ सुरु असते. त्यामुळे येथे दिवसभर गर्दीमुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.शहराच्या उत्तर बाजूस शासनाने लाखो रुपये खर्चून बाह्य वळण रस्ता तयार केला असताना त्या मार्गाने वाहने न जाता थेट शॉर्टकट मारत शहरातून भरधाव वेगाने जातात. पंढरपूर रोडला पहाटे 4.00 ते 7.00 या दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले फिरावयास जातात.यावेळीही सुसाट वेगाने जाणारी वाहने पाहून अक्षरशः जीव मुठीत धरून पायी चालत जावे लागत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत.

Pages