मंगळवेढा तालुक्यातील 91 हजार 845 जनावरे लंपी आजारापासून सुरक्षित..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, September 12, 2022

मंगळवेढा तालुक्यातील 91 हजार 845 जनावरे लंपी आजारापासून सुरक्षित.....

दिव्य न्यूज नेटवर्क मंगळवेढा तालुक्यात 49,342 गायी तर 42,503 म्हैस असे एकूण 91,845 जनावरे असून ही सर्व जनावरे सध्या तरी लंपी या विषाणू आजारापासून सुरक्षित असल्याची माहिती पंचायत समिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.सुहास सलगर यांनी दिली आहे. दरम्यान जि.प.पशुसंवर्धन विभागाकडून येत्या तीन दिवसात लस प्राप्त होणार असून सर्व जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. देशभरातील 16 राज्यात 58 हजार गायींना लंपी या संसर्गजन्य आजाराने पछाडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्याचा आकडा समोर आल्यानंतर महाराष्ट्र शासनानेही पशुधनाच्या जीवाची काळजी घेत संपूर्ण राज्यभर या आजाराबाबत हायअलर्ट केला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आजाराला आटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण जनावरांचे बाजार भरवणे बंदचे आदेश दिले आहेत. सध्या मंगळवेढा तालुक्यातील 91 हजार 845 जनावरांना कुठल्याही आजाराची लागन झाली नसून सध्या ते सुरक्षित आहेत. लगतच्या माळशिरस तालुक्यामध्ये काही प्रमाणात संशयित आजाराची जनावरे दिसून आल्याने पशुपालकामध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील बोराळे, मरवडे, नंदेश्‍वर, आंधळगाव, दहिवडी या ठिकाणी पाच टिम तयार करण्यात आल्या असून या टिम संपूर्ण जनावरावर लक्ष ठेवून आहेत. या जनावरांना 7 हजार लस देण्याचे जि.प.पशुसंवर्धन विभागाने ग्वाही दिली असून ही लस येण्यास अजून तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या जिल्ह्यामध्ये या लसीचा तुटवडा असल्यामुळे जनावरांच्या प्रमाणात लस उपलब्ध होवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. लंपी आजार आल्यानंतर घ्यावयाची काळजी व येवू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत पं.स.पशुसंवर्धन विभागाकडून वेळोवेळी कर्मचार्‍यांच्या व पशुपालक, दूध उत्पादक यांच्या बैठका घेवून मार्गदर्शन केले जात आहे.
मंगळवेढा तालुक्याला लगत कर्नाटक राज्य असल्याने कर्नाटकातून मंगळवेढाकडे जनावरे विक्रीसाठी येणार नाहीत याची खबरदारी घेतली जात असून मरवडे येथील चेकपोस्टला कर्नाटकातून येणार्‍या जनावरांना पायबंद घालावा अशी लेखी पत्र दिले असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. लंपी या जनावराच्या आजारासाठी पशुसंवर्धन विभागाचे सुहास सलगर,डॉ.पांडुरंग हंबरडे,डॉॅ.ब्रह्मानंद कदम, डॉ.रविंद्र बंडगर,डॉ.विजय गायकवाड, तानाजी भोसले,अविनाश पांगे, विक्रम शिंदे आदि कर्मचार्‍यांच्या टिम तयार करण्यात आल्या असून हे कर्मचारी जातीने या आजारावर लक्ष ठेवून आहेत.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी चारा कमी खाणार्‍या जनावरांचा ताप मोजावा व नजीकच्या दवाखान्याशी संपर्क साधावा, बाधीत जनावरे निरोगी जनावरापासून वेगळी ठेवावीत, रोग प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना कळपात सोडू नये, डास, माशा,गोचिड या किटकांचा औषधाच्या सहाय्याने बंदोबस्त करावा, गोठयामध्ये औषधांची फवारणी करणे, आजारी जनावरावर विषारी औषधाची फवारणी करू नये, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना स्थानिक बाजारात नेवू नये.

Pages