भालेवाडी परिसरातील अवैध दारूधंदे बंद करण्याची होतेय मागणी...... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, August 19, 2022

भालेवाडी परिसरातील अवैध दारूधंदे बंद करण्याची होतेय मागणी......

दारूमुळे हजारो संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर .! मंगळवेढा /प्रतिनिधी भालेवाडी येथे खुलेआम अवैध दारूधंदे सुरू असल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर येत आहेत.दरम्यान भालेवाडी, नंदूर, मरवडे,पाटखळ, आदि परिसरातही अवैध दारूधंदे सुरू असल्याचे चित्र असून पोलिस प्रशासनाने तात्काळ हे दारू व्यवसाय बंद करून अनेकांचे मोडकळीस येणारे संसार वाचवून दुवा घ्यावा अशी मागणी प्राधान्याने सुज्ञ नागरिकामधून पुढे येत आहे. भालेवाडी या गावात जवळपास पाच अवैध दारू विक्रीचे दुकाने असून मोठया प्रमाणात दारू विक्री होत असल्याने दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढून अनेकांचे संसार रस्त्यावर येत आहेत. दारू पिणारे रात्रंदिवस त्यामध्ये व्यस्त राहत असल्याने कुटुंबात संघर्ष वाढत आहे. मरवडे, नंदूर या भागातही हीच परिस्थिती असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे.
नंदूर येथे मागील वर्षी एका अवैध दारू विक्रेता पोलिस छापा टाकण्यास आल्यावर पळत जाताना खाली जमिनीवर पडून मार लागून तो मृत्यूमुखी पडला होता. तदनंतर नातेवाईकानी त्याचे प्रेत पोलिस स्टेशनमध्ये आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यानी तात्काळ भेट देवून तणावपूर्ण परिस्थिती हाताळून नातेवाईकांची समजूत काढून प्रेत ताब्यात दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.दारू व्यवसायासाठी एवढा कांड होवूनही पुन्हा याच परिसरात दारू व्यवसाय उदंड वाढत असल्याने नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे. सध्या अधिवेशन चालू असून या अधिवेशनात विरोधकानी अवैध धंद्याविरोधात आवाज उठवल्याने बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने येथील पोलिस प्रशासनानेही जागरूक राहून संबंधित दारू व्यवसायिकावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. युवक पँथरचे अरविंद नाईकवाडी यांनीही पोलिस अधिक्षकाकडे एका निवेदनाद्वारे शहर व ग्रामीण भागात वाढत चाललेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केलेली आहे.

Pages