राष्ट्रीय कुटुंब योजनेसाठी अनुदान नसल्याने निराधार बनले अधिक निराधार....
दिव्य न्यूज नेटवर्क
मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची नुकतीच तहसिलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होवून 48 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असल्याचे संजय गांधी विभागाकडून सांगण्यात आले.मंगळवेढा तालुक्यातून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठी अशी एकूण 64 प्रकरणे प्राप्त झाली होती. यामध्ये संजय गांधी 27 व श्रावणबाळ 21 अशी 48 प्रकरणे मंजूर करण्यात आली. उर्वरीत 16 प्रकरणात विविध त्रृटी असल्यामुळे ही प्रकरणे दुरूस्तीसाठी माघारी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी सध्या बारा प्रकरणे आली असून या विभागाकडे गेल्या अनेक महिन्यापासून अनुदान प्राप्त नसल्याने ही प्रकरणे धुळ खात पडली आहेत. यामध्ये दारिद्रय रेषेखालील यादीत नोंद असलेल्या कुटुंबातील कमवती पुरूष व्यक्ती मृत पावल्यास त्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाला आधार देण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना केंद्राकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये त्या निराधार व्यक्तीला 20 हजाराची मदत मिळते मात्र अनुदान अभावी अद्यापही त्या व्यक्तींना लाभ याचा मिळत नसल्याने या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया निराधार व्यक्तीमधून व्यक्त होत आहेत.
Tuesday, September 13, 2022
