ऐन निवडणुकीत कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाने आ.समाधान आवताडे यांची मोठी पंचाईत .....
मंगळवेढा/प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी थकीत पगार सह विविध प्रलंबित मागण्यासाठी शेकडो संतप्त कामगारांनी कारखान्यासमोर ठिय्या मारत बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामगारांनी आंदोलन पुकारल्याने आ समाधान आवताडे यांची मोठी पंचाईत झाली आहे.

गेले आठ महिने पगार नसल्याने कामगारांना उपासमारीची वेळ आली असून याबाबत कार्यकारी संचालक याना वेळोवेळी निवेदने दिली आहेत मात्र त्याची दखल घेतली नाही. एमडी गणेशकर यांनी दि.६ जुलै रोजी पगारी बाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची कोणतीही पूर्तता न केल्याने संतप्त कामगारांनी शुक्रवारी सकाळी कारखाना गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी याप्रसंगी कर्मचाऱ्याचा आठ महिन्याचा थकीत पगार प्राधान्याने पुर्णपणे द्यावा, हंगामी कामगारांचा सन २०२१ चा रिटेंशन अलौंस व २०२२ ची लिव्ह सॅलरी थकीत आहे , सन २०२० साली जाहीर केलेला १० दिवसाचा बक्षीस पगार देणे थकीत आहे तो पुर्णपणे द्यावा, सेवामुक्त व मयत कामगारांचे फायनल पेमेंट अंदाजे ५ ते ७ वर्षापासून थकीत आहे तो पूर्णपणे द्यावा.
मागील १५ टक्के व १२ टक्के पगारवाढीच्या फरकाची रक्कम थकीत आहे, कामगारांचा ऑक्टोबर २०१९ पासून चालु मे २०२२ पर्यंतचा ३१ महिने प्रॉव्हिडंट फंड भरला नाही. त्यामुळे ज्या कर्मचा-याचे ५८ वर्ष वय पूर्ण झाले आहे व जे निवृत्त झाले आहेत त्यांना पेंशनचा लाभ मिळत नसलेने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे संपुर्ण फंड भरणा करावा.
कामगार पतसंस्थेची पगारातून कपात केलेली रक्कम अंदाजे २ कोटी ५० लाख कारखान्याकडे थकीत असलेने कामगारांना कर्ज सुध्दा मिळत नाही. पतसंस्थेची रक्कमा देण्यात याव्यात,वार्षिक वेतनवाढीच्या फरकाची रक्कम देणे थकीत आहे त्या प्राधान्याने पुर्ण द्यावात.दोन बोनस व एक बोनसची फरक रक्कम देणे थकीत आहे. बोनसची रक्कम देणेत यावी अशा प्रलंबित मागण्याची तात्काळ पूर्तता करावी असे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या आंदोलनात कामगार संघटनेचे पंडित पाटील, भारत मासाल,सुनील ठेंगील,सौदागर मोरे, बाळासाहेब नागणे,नामदेव कांबळे,भागवत बेदरे, चंद्रकांत बेदरे,पोपट रोकडे,अंकुश गोसावी, संभाजी गोसावी यांच्यासह २५० कामगार उपस्थित होते.कामगारांच्या थकीत पगारी बरोबर शेतकऱ्यांची शेवटच्या टप्प्यातील ऊस बिले पण थकीत असल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
आठ महिन्याच्या थकीत पगारीसह कामगारांचा ऑक्टोबर २०१९ पासून मे २०२२ पर्यंतचा ३१ महिने प्रॉव्हिडंट फंड भरला नाही त्यामुळे कामगारांची फरफट सुरू आहे वेळेवर पगारी मिळत नसल्याने कामगारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे केवळ आश्वासने देऊन कामगारांची बोळवण केली जात आहे. जो पर्यत सर्व मागण्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनाचा लढा सुरू राहील.
पंडित पाटील
कामगार संघटना