मंगळवेढा पोलिसांना मागील सालातील आठ घरफोडयांचा तपास करण्यात यश.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 10, 2022

मंगळवेढा पोलिसांना मागील सालातील आठ घरफोडयांचा तपास करण्यात यश....

डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांची माहिती.. दिव्य न्यूज नेटवर्क मंगळवेढा तालुक्यात घरफोडीच्या तयारीने आलेल्या दोघा सराईत चोरटयांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सन 2021 या सालातील जवळपास 8 घरफोडया उघड होवून त्यामधील 5 लाख 58 हजार 300 रुपये किमतीचे 10 तोळे सोने जप्त करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आल्याची माहिती डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील सराईत आरोपी संतोष मच्छिंद्र चव्हाण,मोहन उर्फ महेश मच्छिंद्र चव्हाण(दोघे रा.मदार वस्ती ता.जत जि.सांगली) हे दि.2 मार्च रोजी मंगळवेढा तालुक्यातील वाणी चिंचाळे मार्गे शिरशी गावाकडे चोरीच्या उद्देशाने मोटर सायकलवरून रात्री 9.00 वा. येत असल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांना मिळताच पोलिस निरिक्षक रणजित माने,पोलिस नाईक दयानंद हेंबाडे,सुनिल मोरे,पोलिस शिपाई सुरज देशमुख,वाहन चालक वाघमोर व सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसोा पिंगळे,पोलिस हवालदार सुनिल गायकवाड,प्रमोद मोरे, पोलिस हवालदार महेश कोळी अशी दोन पथके त्या परिसरात सापळा लावल्यानंतर वरील दोघे मोटर सायकलवर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास येताच दोन्ही पथकाने पाठलाग करून त्या दोघांना पकडले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी संतोष इंगोले पडोळकरवाडी,बाळासोा कांबळे रड्डे,सरुबाई बड्डे हुलजंती, जितेंद्र राठोड बालाजीनगर,अभिमान बाबर बठाण,धनाजी आसबे घाटूळवस्ती,सिध्दाराम वालेकर कात्राळ,शिवराज बिराजदार नंदूर आदी ठिकाणी घरफोडया केल्याची कबुली दिली.तसेच त्यांच्याकडून या घर फोडयामधील 5 लाख 58 हजार 300 रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने व मोटर सायकल पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून घरफोडीत वापरलेले चाकू,अ‍ॅडजेस्ट पाना,स्क्रू ड्रायव्हर,बॅटरी,लोखंडी कटावनी व इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.त्या दोघां चोरटयांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सोलापूर शहर,मोहोळ,सांगोला,पंढरपूर,सांगली,कोल्हापूर जिल्हयात घरफोडी केल्याची माहिती समोर येत आहे.अन्य एक साथीदार या चौकशीत निष्पन्न झाला असून त्याचा शोध घेवून लवकरच अटक केली जाईल असे पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सांगितले. ओळी - मंगळवेढयात आठ घरफोडयातील जप्त 10 तोळे सोन्याचे विविध दागिने छायाचित्रात दिसत आहेत.

Pages