राष्ट्रिय महामार्ग भिमानदीवरील पुलाचे फित कापून जिल्हाधिकारी शंभरकर यांचे हस्ते उदघाटन.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, February 21, 2022

राष्ट्रिय महामार्ग भिमानदीवरील पुलाचे फित कापून जिल्हाधिकारी शंभरकर यांचे हस्ते उदघाटन....

 

या पुलामुळे भविष्यात  महापूरापासून वाहातुकीची  झाली सुटका



मंगळवेढा/प्रतिनिधी

          कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील माचणूर येथील भिमा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते फित कापून एका बाजूने वाहतुकीस खुला करून देण्यात आला. दरम्यान,या नवीन पुलामुळे भविष्यात महापुराचे पाणी पुलावर येणार नसल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका झाली आहे.

           कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील माचणूर येथील भिमा नदीवर पुर्वी जुना पुल होता. या पुलावर पावसाळयात महापुर आल्यानंतर पाणी येवून वाहतुक थांबली जात असे. हा नवीन पुल जुन्या पुलापेक्षा उंच असल्याने भविष्यात कधीच महापुराचे पाणी पुलावर येणार नसल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे. या नवीन पुलाचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते फित कापून नुकतेच करण्यात आले. पुलावरून वाहतुक एका बाजुने सुरळीत करण्यात आली आहे. तर पुलाच्या दुसर्‍या बाजूचे काही अंशी काम सध्या बाकी असल्याने ते पुर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूने वाहतुक सुरळीत सुरू होणार आहे.   

  • माचणूर येथील भिमा नदीवरील नवीन पुलाचे फित कापून उदघाटन करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महामार्गाचे संजय कदम व अन्य छायाचित्रात दिसत आहेत. 

                 भिमा नदी व तिर्‍हे येथील सीना नदीवर पुल झाल्याने विनाअडथळा वाहतुक सुरू झाली आहे परिणामी जवळपास राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णत्वाकडे वाटचाल करीत असल्याने मंगळवेढा ते सोलापूर हे अंतर कमी होवून एक तासात सोलापूरला पोहचत असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माचणूर येथील तलाठी कार्यालयास भेट देवून सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाबाबत तलाठी व ग्रामस्थांना माहिती दिली. जि.प.चे मुख्य कार्यकार अधिकारी दिलीप स्वामी यांनी ज्या प्रमाणे जिल्ह्यातील जि.प.शाळा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत रंगीबेरंगी केल्या त्याच धर्तीवर लोकसहभागातून सर्व तलाठी कार्यालय रंगीबेरंगी करण्यात येणार असल्याने या कार्यालयाना नवीन लुक प्राप्त होणार आहे. 

           माचणूर नंतर ब्रह्मपुरी, पाठखळ येथील मंडल अधिकारी कार्यालय यांना जिल्हाधिकार्‍यांनी भेट देवून मार्गदर्शन  केले. पाठखळ येथे नवनिर्मित मंडल अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.या कार्यक्रमास प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसिलदार स्वप्निल रावडे, महामार्गचे संजय कदम, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, असलम चौधरी, तलाठी समाधान वगरे, माचणूरचे सरपंच प्रकाश डोके, उपसरपंच उमेश डोके, सदस्य तानाजी डोके, नागेश निकम, संजय कुरवडे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

           सुंदर माझे कार्यालय अंतर्गत पुढील बाबीची होणार पुर्तता परिसर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे, दर्शनी भागात कार्यालयाचा बोर्ड लावणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांचा गावभेटीचा तपशीलचा फलक लावणे, नागरिकांचे सनद व माहिती अधिकाराचा फलक, गाव नकाशा, गाव आदर्श तक्ता, लाचलुचपत विभागाचा फलक, महत्वाचे फोन क्रमांक, कर्तव्यावर असताना शासकीय ओळखपत्राचा नियमित वापर करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृह, कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून जोपासना करणे, कार्यालयीन कामकाज गतीमान होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरा पेटीची व्यवस्था आदि करणे. 



Pages