पोलिस निरिक्षकावर वरिष्ठांच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल असे डी.वाय.एस.पी.नी पत्र दिल्याने जनहितचे बेमुदत आंदोलन अकरा दिवसानंतर समाप्त.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, January 13, 2022

पोलिस निरिक्षकावर वरिष्ठांच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल असे डी.वाय.एस.पी.नी पत्र दिल्याने जनहितचे बेमुदत आंदोलन अकरा दिवसानंतर समाप्त....

 


मंगळवेढा/प्रतिनिधी 

           मंगळवेढा डी.वाय.एस.पी.कार्यालयासमोर गेली अकरा दिवस सुरु असलेले जनहित शेतकरी संघटनेचे  बेमुदत धरणे आंदोलन डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यावर वरिष्ठांच्या अहवालानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर ते आंदोलन गुरुवारी माघारी घेण्यात आले.

          मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांच्या भक्ती व नम्रता या लहान मुलींनी बासुंदी,पनीर खाल्ल्यानंतर विषबाधा होवून मृत्यू झाला होता.या घटनेची चव्हाण कुटुंबिय पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिस निरिक्षक गुंजवटे यांनी फिर्याद नोंदवून घेण्यात कर्तव्यात कसूर केल्यामुळे आरोपीला संधी मिळून ते फरार झाले होते. तसेच मंगळवेढयात पडलेले तीन दरोडे व दरोडयातून झालेला खून व गेली दोन वर्षे झालेल्या छोटया मोठया चोर्‍या या घटना हाताळण्यात त्यांना अपयश आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवून नागरिकांचा जीव असुरक्षित बनला होता. या घटनेवरून  जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.3 जानेवारी रोजी मरवडे येथे ग्रामस्थांनी  रास्ता रोको करून डी.वाय.एस.पी.कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करून पोलिस अधिकार्‍यावर निलंबन कारवाई व विभागीय चौकशी झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही हा पवित्रा आंदोलकांनी घेवून ऐन कडाक्याच्या थंडीत आंदोलकांनी आंदोलन केले. 

               भक्ती व नम्रता चव्हाण या दोन लहान बालिकांचा नाहक बळी गेल्याने समाजातून आंदोलनास मोठा पाठींबा मिळत गेला. परिणामी पोलिस प्रशासनास आरोपीना शोधून अखेर अटक करावी लागली. मात्र पोलिस अधिकार्‍यावर कुठलीच कारवाई न केल्याने प्रभाकर देशमुख यांनी थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोज लोहिया यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून निलंबन व विभागीय चाैकशी करन्याची मागणी केली असता लोहिया यांनी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून विनाविलंब अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.यावरही आंदोलकांचे समाधान न झाल्याने आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम राहिले होते. 

              डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी दि.13 रोजी आंदोलकांशी चर्चा करून मरवडे येथील मयत झालेल्या मुलीच्या घटनेत दि.6 रोजी आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांची दि.11 रोजी सोलापूर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्यावर वरिष्ठांचे अहवालानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तुमचे धरणे आंदोलन व रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात यावे अशा मजकुराचे लेखी पत्र दिल्यानंतर आज गुरुवारी होणारा रास्ता रोको आंदोलन रद्द करून  बेमुदत धरणे आंदोलन  संपविण्यात आले.व पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदाेलन करन्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.


Pages