शाळा सुरु झाल्याने शहरातून जाणारी अवजड वाहने बंद करण्याची मागणी..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 30, 2021

शाळा सुरु झाल्याने शहरातून जाणारी अवजड वाहने बंद करण्याची मागणी.....


नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी लक्ष घालण्याची गरजमंगळवेढा/प्रतिनिधी

            मंगळवेढा शहरातून अवजड वाहनाबरोबर ऊसाने भरलेली वाहनेही दिवसा जात असल्याने शालेय विदयार्थी व नागरिकांना जीव मुठीत धरून दामाजी चौकातून जावे लागत असल्याने पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता येथून जाणारी ऊसाची व अवजड वाहने  तात्काळ बंद करावीत अशी मागणी शहरवासियांतून पुढे येत आहे.

               मंगळवेढा शहरातून विजापूर-पंढरपूर हा महामार्ग  सिमेंट काँक्रीटचा केल्यामुळे वाहनचालकांना त्यांचा मोह आवरत नसल्याने अवजड वाहने व ऊसाची ट्रॅक्टरसारखी वाहने थेट  भर शहरातून  जात असल्याचे चित्र आहे. सध्या शासनाने पहिली ते उच्च माध्यमिक वर्ग सुरु करण्यास मंजुरी दिल्याने शाळेचे वर्ग विदयार्थ्यानी गजबजले आहेत.दामाजी चौकातच मोठे हायस्कूल असल्याने या विदयार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. तसेच थोडया अंतरावरच बसस्थानक व शासकीय पंचायत समिती कार्यालय असल्याने येथील वर्दळ मोठी असते. त्याचबरोबर या परिसरात हातगाडेवालेही मोठया संख्येने व्यवसायानिमित्त थांबत असल्याने व जाणार्‍या येणार्‍या वाहनामुळे येथील वाहतूकीची कोंडी होते.ऊस भरून ट्रॅक्टर शहरातून जात असल्यामुळे पालक वर्गातून भिती व्यक्त केली जात आहे.ट्रॅक्टरमध्ये 20 ते 22 मे.टन ऊस भरला जात असून ट्रेलरमध्ये ऊस उंच भरल्याने स्पिड बेकरवरून ट्रेलर पलटी होवून अपघात होण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविली जात आहे. याच चौकात पाठीमागे टेंपोने जोराची धडक दिल्याने एका गृहस्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरातून जाणारी सर्व वाहने शहराच्या बाह्य वळणाने वळवावीत अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.

             नगरपालिका प्रशासनाने  याकडे डोळेझाक न करता अवजड वाहनाकडे गांभिर्यपूर्वक पाहून राष्ट्रीय अभियंत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढीत शहराच्या बाह्य वळणाने वाहतुक वळविण्यासाठी पोलिस प्रशासनास मदत करावी अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांतून होत आहेत.वारंवार नागरिकांनी मागणी करूनही नगरपालिका प्रशासन व  पोलिस प्रशासन याकडे गांभिर्याने पहात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. बोराळे नाक्यावरही मागील दोन आठवडयापुर्वी ऊसाच्या ट्रॅक्टरने एका इसमाला धडकल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे अपघात टाळण्यासाठी शहरातील अवजड वाहतूक बंद करणे काळाची गरज आहे.Pages