मंगळवेढा ब्रेकिंग:-अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधिक्षकांचे स्पेशल पथक मंगळवेढयात दाखल,दोघांवर गुन्हे दाखल..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 31, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग:-अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधिक्षकांचे स्पेशल पथक मंगळवेढयात दाखल,दोघांवर गुन्हे दाखल.....

 

दिव्य न्यूज नेटवर्क

                मंगळवेढयातील वाढते अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयाचे विशेष पथक मंगळवेढयात दाखल झाले असून शहर व ग्रामीण भाग फिरून अवैध धंदयाची माहिती जाणून घेत कारवाई करत आहे. दरम्यान,निंबोणी येथे  रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या व्यक्तीकडून अंदाजे आकडयावर पैसे लावून कल्याण  मटका घेणार्‍या नवनाथ गणपती सलगर  व सिध्देश्वर सलगर (रा.घरनिकी) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून गुरुवारी रात्री उशीरापर्यंत हे पथक मंगळवेढा शहरातून फिरून अवैध व्यवसायिकांचा शोध घेत होते.

                  मंगळवेढा तालुक्यात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर या शिथीलतेबरोबर अवैध धंदयांचाही आलेख वाढत जात असल्याचा आरोप नागरिकांचा असून याबाबतच्या तक्रारी थेट पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुज्ञ नागरिक करीत आहेत.या वाढत्या अवैध धंदयाला रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयाचे एक स्पेशल पथक गुुरुवारी रात्री 11.00 वाजेपर्यंत अवैध धंदयाचा शोध घेत फिरत असल्याचे चित्र होते. 


             या पथकाने दि. 29 रोजी 3.30 वा. निंबोणी बसस्थानकाजवळ असलेल्या वडयाच्या झाडाखाली कट्टयावर चौकात यातील आरोपी नवनाथ सलगर हा येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून अंदाजे आकडयावर पैसे लावून कल्याण मटका घेत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता बुकीमालक सिध्देश्वर सलगर (रा.घरनिकी) यांच्याकडे पैसे देत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून पोलिसांनी रोख 1025 रुपये व जुगार साहित्य जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई मोहन मनसावले यांनी त्या दोघांविरूध्द  फिर्याद दिली आहे.दरम्यान,अवैध धंदा करणारे अट्टल व्यवसायिक मात्र पोलिसांना चकवा देत आपला व्यवसाय करण्यात मग्न असल्याचे बसस्थानक परिसरातील टपर्‍याच्या आडोशाला बसून आपली पोळी भाजून घेत असल्याचे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.

Pages