त्या पिसाळलेल्या लांडग्याने चार गावात धुमाकूळ घालून 12 जणांना केले जखमी.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 13, 2021

त्या पिसाळलेल्या लांडग्याने चार गावात धुमाकूळ घालून 12 जणांना केले जखमी....


दिव्य न्यूज नेटवर्क

            मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु.,बावची,पौट,जित्ती येथील 12 व्यक्तींवर  पिसाळलेल्या लांडग्याने रात्रीच्यावेळी झोपेत असताना हल्ला केल्याने हे सर्वजण जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय व अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान,त्या मृत लांडग्याचे शवविच्छेदन  करण्यात आले असून तो पिसाळलेला आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्याचे  शँम्पल  घेण्यात आले आहे.ते शॅम्पल तपासणीसाठी पुणे येथे वन विभागाकडून  पाठविण्यात आले आहे.तसेच वन विभागाकडून जखमींना आर्थिक मदत मिळविण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.

             दि.13 च्या मध्यरात्री एका पिसाळलेल्या लांडग्याने सलगर खु.,बावची,पौट,जित्ती या गावात धुमाकूळ घालून 12 जणांना गंभीर जखमी केले आहे.दरम्यान यामध्ये एक गाय व म्हैस या प्राण्यावरही त्याने हल्ला चढवून जखमी केले आहे.

सलगर खु.येथील जयहिंद तुकाराम खडतरे,संगिता जयहिंद खडतरे,अक्षय जयहिंद खडतरे,तुकाराम धोंडीराम खडतरे या कुटुंबियावर लांडग्याने हल्ला केल्याने लहान मुलासह घरातील चौघेजण जखमी झाले आहेत.

            पौट येथील भारत विठोबा म्हमाणे,जित्ती येथील सुभद्राबाई गजेंद्र पांढरे,काशिनाथ लक्ष्मण बंडगर,बावची येथील तानाजी श्रीरंग चव्हाण,सुखदेव सिदू जाधव,यशराज राजू फौंडे,अनिता बसवराज माळी,पारुबाई इरण्णा माळी आदी जखमी झालेल्या व्यक्ती आहेत. हे सर्व  जखमी घराच्या समोर झोपले असता लांडग्याने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. सलगर येथे एका व्यक्तीवर मध्यरात्री हल्ला करताना लांडग्याने बराच वेळ पकडलेले नरडे  न सोडल्याने त्याचे  कुटुंबीय आवाजाने जागे झाले.व जखमीच्या मुलाने काठीने लांडग्यावर जोराचा प्रहार केल्याने तो पिसाळलेला लांडगा जागीच मयत झाल्याने त्या भेदरलेल्या कुटुंबियाने सुटकेचा निःश्‍वास सोडला.या घटनेचे वृत्त मंगळवेढा तालुकाभर वार्‍यासारखे पसरले             

            सोलापूर जिल्हयाचे वनअधिकारी धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक बाबासाहेब हाके, वन परिक्षेत्र विलास पौळ,सुभाष बुरुंगले,भागवत मासाळ,मधुकर बनसोडे,मधुकर काशिद,राजाराम राऊत,सोमलिंग लेंगरे आदींची टिम दाखल होवून त्यांनी घटनास्थळाचे पंचनामे करून  जखमी लोकांचे जाब जबाब नोंदवून घेतले.पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र बंडगर यांनी मृत लांडग्याचे शवविच्छेदन करून त्याचे शॅम्पल घेवून ते वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.हे शॅम्पल वन विभाग पुणे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.सलगर येथील एकाच कुटुंबातील चौघांवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.हा लांडगा पिसाळलेला आहे की नाही याबाबत प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच नेमके कळणार आहे.वन विभागाच्या माहितीनुसार हा पिसाळलेला लांडगा असावा असा प्राथमिक अंदाज असून तो पिसाळल्याशिवाय कळपाच्या बाहेर पडू शकत नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. या जखमींना शासकीय पातळीवर मदत मिळविण्याचे प्रयत्न वन विभागाकडून  वरिष्ठ पातळीवरून सुरु आहेत.जयहिंद खडतरे यांच्या नाकाला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

            दरम्यान,गुंजेगाव व घरनिकी तसेच सांगोला येथील गावात  सन 1998 ला पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकुळ घालून काही व्यक्तींना जखमी केले होते.23 वर्षानंतर पुन्हा लांडग्याने धुमाकूळ घालून तब्बल 12 व्यक्तींना जखमी केले आहे.

 1. बारा व्यक्तीवर हल्ला करून जखमी केलेला हाच तो मृत लांडगा छायाचित्रात दिसत आहे.

 2.मृत लांडग्याची पाहणी करताना वन विभागाची टिम छायाचित्रात दिसत आहे

Pages