मंगळवेढ्यात अवैध धंद्याला ऊत चक्क शैक्षणिक संस्था परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच,पाेलीस अधिक्षकांनी लक्ष घालन्याची गरज....! - Divyaprabhat News

Breaking News

Friday, March 5, 2021

मंगळवेढ्यात अवैध धंद्याला ऊत चक्क शैक्षणिक संस्था परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच,पाेलीस अधिक्षकांनी लक्ष घालन्याची गरज....!

 

दिव्य न्यूज नेटवर्क

              शासनाने एक आदेश काढून शालेय परिसरातील दारू विक्री, गुटखा विक्री, तंबाखु विक्री यावर बंदी घालून शिक्षण विभागाने व्यसनमुक्त शाळा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला असताना मंगळवेढा शहरानजीक एका मोठया शैक्षणिक संस्था परिसरात चक्क रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याने पालक व नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

                   मंगळवेढा शहरानजीक साखर कारखाना रोडलगत एक मोठी शैक्षणिक संस्था असून या संस्थेत मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम वर्ग असल्याने मोठया प्रमाणात शहरातून व ग्रामीण भागातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करीत आहेत. एका ढाबा चालकाने शाकाहारी जेवण मिळेल असा बोर्ड लावून त्या नावाखाली चक्क बेकायदा दारू विक्री करून रिकाम्या झालेल्या बॉटल रस्त्याच्या कडेला फेकल्याने दारूच्या बाटल्यांचा ढिगारा लागलेला आहे. 

          

नागरिक व पालक या रस्त्यावरून ये-जा करताना नाक मुरडून त्यांना जावे लागत आहे. काही अंतरावरच ज्ञानार्जन करणारी शैक्षणिक संस्था असल्याने पोलिस मात्र डोळे असून अंधळे झाल्याची नागरिकामधून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध व्यवसाय बंद असल्याचे नागरिकांना ठामपणे सांगत असतानाच दारूच्या रिकाम्या बाटल्याचा ढिगारा नागरिकांच्या नजरेस येत असल्याने पोलिस प्रशासनाच्या सांगण्यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. दरम्यान, यापुर्वी दामाजीनगर ग्रामपंचायतीने अवैध व्यवसाय हद्दीत न करणेबाबतचा ठरावही केला आहे.याची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होतेय या घटनेवरून दिसून येत आहे. मंगळवेढयातील अवैध धंद्याबाबत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यानी एकत्र येवून मागील आठवडयातच अवैध धंदे बंद करा,अन्यथा आंदोलन केेले जाईल असा इशारा दिला होता. मात्र या इशार्‍याचा कुठलाही परिणाम झाल्याचे या बटल्याच्या ढिगार्‍यावरून दिसून येत नाही.आंदोलनाचा इशारा हा खराच होता की नौटंकी होती? असा सवालही शहरवासीय त्या कार्यकर्त्यांना विचारत आहेत. कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक यांनीच याकामी लक्ष घालून शालेय परिसरातील दारूचे व्यवसाय बंद करावेत अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.मंगळवेढा शहरानजीक असलेल्या शाळेच्या परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

Pages