मंगळवेढा तालुक्यातील 10 कोटी 5 लाख 58 हजार थकबाकी; विज बिल वसुलीसाठी 12 पथके कार्यान्वित.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, February 19, 2021

मंगळवेढा तालुक्यातील 10 कोटी 5 लाख 58 हजार थकबाकी; विज बिल वसुलीसाठी 12 पथके कार्यान्वित....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

                     मंगळवेढा तालुक्यातील घरगुती,व्यापारी, औद्योगिकचे 19 हजार 916 ग्राहक असून त्यांच्याकडे 10 कोटी 5 लाख 58 हजार थकबाकी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.दरम्यान,कृषीपंपाचे 22 हजार 861 ग्राहक असून शेतकर्‍यांकडे  थकीतपोटी 292 कोटी 15 लाख इतकी रक्कम असल्याने शेतकर्‍यांनी कृषी विज बिल सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विज वितरण  कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

                 

मंगळवेढा तालुक्यात घरगुतीचे 18 हजार 218 ग्राहक असून त्यांच्याकडे 7 कोटी 24 लाख 38 हजार तर  व्यापारी ग्राहक 1374 असून या ग्राहकांकडे 1 कोटी 30 लाख 61 हजार तसेच औद्योगिक ग्राहक 324 असून 1 कोटी 50 लाख 58 हजार थकीत आहेत.दरम्यान या सर्व ग्राहकांकडे 10 कोटी 5 लाख 58 हजार इतकी रक्कम येणेबाकी आहे.तसेच शेतीपंपाचे ग्राहक 22 हजार 861 असून 292 कोटी 15 लाख 4 हजार इतक्या रकमेचे  बील थकले आहे. केवळ मंगळवेढा शहरात घरगुती 5465 ग्राहक असून त्यांच्याकडे 2 कोटी 94 लाख 25 हजार येणेबाकी आहे.शहरातील औद्योगिकचे 105 ग्राहक आहेत.त्यांच्याकडे 69 लाख थकीत बाकी आहे.या वसुलीसाठी विज वितरण कंपनीने 12 पथके तयार केली असून यामध्ये कनिष्ठ अभियंते,फोरमन,लाईनमन,उपकार्यकारी अभियंते यांचा समावेश असून दि.17 रोजीा एकाच दिवशी अडीच कोटीची वसुली झाल्याचे विज वितरणकडून सांगण्यात आले.शेतीपंपासाठी कृषी विज बिल सवलत योजना सन 2020 जाहिर करण्यात आली असून यामध्ये माहे सप्टेंबरच्या विज बिलातील 50 टक्के मूळ थकबाकी भरल्यास 50 टक्के सूट,विलंब आकार पूर्णपणे शंभर टक्के माफ करण्यात आला आहे.

              माहे सप्टेंबर 2015 पर्यंत थकबाकीवरील 100 टक्के व्याज माफ करण्यात आले आहे.सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील व्याज 18 टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराने आकारणी करण्यात येत आहे.विज बिलात सवलत मिळविण्यासाठी चालू विज बिल भरणे बंधनकारक आहे. रोहित्र स्तरावर सर्व कृषी ग्राहकांनी 100 टक्के चालू बिल व थकबाकी भरल्यास वीज बिलावर 10 टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विजवितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी केले आहे.

                काही शेतकर्‍यांना 5 एच.पी.ऐवजी 15 व 10 एच.पी.चे विज बिल दिल्याने विज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उजेडात आला आहे.विज वितरण अधिकार्‍यांनी ही चूक मान्य करून असा प्रकार क्वचित झाल्याचे सांगितले.चुकीची बिले आली असल्यास त्याची दुरुस्ती करून दिली जाईल असेही सांगण्यात आले. 

Pages