मंगळवेढयातील वाढत्या अवैध धंदयाविराेधात राजकिय पक्ष एकवटले;अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा गृहमंत्र्यांना दिला इशारा... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, February 20, 2021

मंगळवेढयातील वाढत्या अवैध धंदयाविराेधात राजकिय पक्ष एकवटले;अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा गृहमंत्र्यांना दिला इशारा...

 

दिव्य न्यूज नेटवर्क

          मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मटका,जुगार,वाळू तस्करी या अवैध धंदयासह चोर्‍यांचे प्रमाण  वाढत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यास पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत आहे. दरम्यान, या सर्व अवैध धंदयावर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम पोलिस अधिकार्‍याची मंगळवेढयाला गरज असल्याने भाजप,शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी या सर्व पक्षाचे कार्यकर्ते अवैध धंदयाच्या विरोधात एकटवले असून त्यांनी याबाबतचे निवेदन पोलिस प्रशासनास देवून हे अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येवून जनआंदोलन छेडण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही  लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.

         


           मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात मटका,दारू,जुगार,बेकायदा वाळू उपसा आदी व्यवसायाने मोठया प्रमाणात डोके वर काढल्याने गोरगरीबांचे संसार रस्त्यावर येत आहेत.यामध्ये मजूर लोक व तरूण मुले अडकले जात असल्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या चोर्‍यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत असून चोरटयांना पकडण्यास पोलिस यंत्रणा अपयशी ठरत आहे. परिणामी चोरटयांचे बळ वाढत असल्याने एकाच रात्री सिध्दापूरमध्ये सहा किराणा दुकाने व मेडिकल फोडण्यात आल्याची घटना घडली आहे.या वाढत्या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

                 भविष्यात पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील रिक्त जागेसाठी निवडणूक होणार असल्याने हे अवैध धंदे त्या दृष्टीने घातक आहेत.रात्रभर भिमा व माण नदीमधून बेसुमार  वाळू उपसा चालू असल्याने शासनाची मालमत्ता चोरीला जावून शासनालाच  आर्थिक फटका बसत आहे.मटका,जुगार बिनबोभाट सुरु आहे. ढाब्यावरून जेवणाच्या नावाखाली अवैध दारू विक्री रात्रंदिवस  सुरु असतानाही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.या वाढत्या अवैध व्यवसायाला पोलिस प्रशासनच जबाबदार असून कारवाई करण्यात ते कुचकामी ठरत असल्याने मंगळवेढयाला सध्या कार्यक्षम पोलिस अधिकार्‍याची गरज आहे.तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी जिल्हयातील अवैध व्यवसाय हद्दपार केल्याने  गोरगरीबांचे संसार सुरक्षित राहिले होते. परिणामी महिला वर्गानी त्या अधिकार्‍यांचे कौतूकही केले होते.

              सिंगम अशी ओळख असलेल्या महिला पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवैध धंदयाबाबत संबंधित पोलिस अधिकार्‍यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा दिला असतानाही त्याकडे पोलिस अधिकार्‍यांनी साफ दुर्लक्ष केल्यानेच अवैध धंदयात वाढ होत असल्याचे नागरिकांना दिसून येत आहे या अवैध धंदयाबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया,पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना या निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या असून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंंबर वाडदेकर,भाजपाचे सरचिटणीस शशिकांत चव्हाण,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भारत बेदरे,भाजपा शहराध्यक्ष गोपाळ भगरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड.राहुल घुले,भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल,शिवसेना तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार संघाध्यक्ष मारुती वाकडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुझम्मील काझी,काँग्रेसचे शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.

          मंगळवेढयात वाढलेले अवैध धंदे बंद करण्याबाबतचे निवेदन पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांना देताना अ‍ॅड.नंदकुमार पवार,शशिकांत चव्हाण,औदुंबर वाडदेकर,गोपाळ भगरे,गौरीशंकर बुरकूल,मारुती वाकडे,दिलीप जाधव  यांचेसह अन्य कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत. 

Pages