मंगळवेढा पंचायत समितीमध्ये घरकूल धारकांची होतेय आर्थिक पिळवणूक... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, December 31, 2020

मंगळवेढा पंचायत समितीमध्ये घरकूल धारकांची होतेय आर्थिक पिळवणूक...


या घटनेची चौकशी करून  संबंधितावर कारवाई करण्याची मागणी


दिव्य न्यूज नेटवर्क

              मंगळवेढा पंचायत समितीमधील प्रधानमंत्री  घरकूल आवास योजनेचे कामकाज पाहणार्‍या  टेबलधारकाकडून घरकूल प्रस्ताव देताना व अनुदान घेणार्‍या घरकुल धारकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी असून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याकामी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून  होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी नागरिकांतून मागणी पुढे येत आहे.

                 

मंगळवेढा तालुक्यात सन 19-20 या वर्षासाठी  992 प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले आली आहेत.प्रत्येक घरकुलास 1 लाख 20 हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळते. घरकूलधारक ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव देण्यासाठी संबंधित टेबलधारकाकडे आल्यानंतर त्यांच्या हातावर चिरीमिरी ठेवल्याशिवाय कागदच पुढे सरकत नसल्याने याचा नाहक त्रास  घरकूलधारकांना होत असल्याने ते त्रस्त झाले असून संबंधित टेबलधारकाची तेथून उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. 

           प्रस्तावाव्यतिरिक्त घरकुल अनुदानाचा चेक देते प्रसंगीही चिरीमिरीची अपेक्षा ठेवली जात असल्याने घरकूल धारकांची दोन्ही बाजूने लूट होत असल्याने  घरकूल धारकांमधून संताप व्यक्त होत.घरकूल धारक हे  मागासवर्गीय व दारिद्र रेषेतील असल्यामुळे  मुळात त्यांच्याकडे आर्थिक चणचण भासत असताना पंचायत समितीमधील शासकीय कर्मचारी शासनाचा पगार घेत असताना त्यांना  घरकूलासाठी दामाजी मोजावा लागत असल्याने इकडे आड,तिकडे विहिर अशी स्थिती घरकूल धारकांची झाली आहे.

             सध्या महिला गटविकास अधिकारी हया कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयात मनमानी सुरु आहे.सध्या  शासनाने  शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसाचा आठवडा केला आहे. कार्यालयीन वेळ ही सायंकाळी 6.00 पर्यंत ठेवली असताना पंचायत समितीमधील कर्मचारी निवडणूकीच्या नावाखाली 5.00 वाजताच निघून जात असल्याने  कार्यालयातील टेबल ओस पडत आहेत.सध्या गटविकास अधिकार्‍यांचा तात्पुरता कार्यभार पंढरपूर येथील गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे यांच्याकडे आहे.

Pages