पोलीस अधीक्षकांचा दणका! नियमबाह्य कामे करणार्‍या त्या दोन पोलिसांची उचलबांगडी.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, November 7, 2020

पोलीस अधीक्षकांचा दणका! नियमबाह्य कामे करणार्‍या त्या दोन पोलिसांची उचलबांगडी....


पोलिस अधिक्षकांची धडाकेबाज  कारवाई...

दिव्य न्युज नेटवर्क 
          मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई संदिप सावंत व पैगंबर नदाफ या दोघांनी नियमबाह्य कामे केल्याची गोपनीय तक्रार पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना प्राप्त होताच त्यांनी तात्काळ त्या दोघांची उचल बांगडी पोलिस मुख्यालयात केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.दरम्यान,या दोघांच्या चौकशीसाठी करमाळा विभागाचे डी.वाय.एस.पी.विशाल हिरे यांचेकडे देण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
                 
पोलिस शिपाई संदिप सावंत,पैगंबर नदाफ हे दोघे मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांना येथील अधिकार्‍यांनी विशेष पथक म्हणून दोन महिन्यापासून  नेमले आहे. यांच्याकडे अवैध वाळू उपसा,जुगार,मटका,अवैध दारू धंदे यावर  कारवाई  करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.कारवाई करण्यापेक्षा त्यांचा अन्य गोष्टीकडे जास्त कल असल्याच्या तक्रारी होत्या. यापुर्वी जुगारातील मुद्देमाल हडप केल्याची तक्रार डी.वाय.एस.पी.यांचेकडे केली होती. मात्र या चौकशीत त्यांना क्लिन चिट मिळाली होती. तक्रार येवूनही पुन्हा  त्यांना अधिकार्‍यांनी पथकात ठेवल्यामुळे नागरिकातून तक्रारीचा सूर वाढत गेला.  या अचानक झालेल्या दोघांच्या उचल बांगडीमुळे पोलिस दलात उलट सुलट चर्चा सुरु आहे. वाळूचे वाहन कारवाई न करता स्वतःच्या फायदयासाठी बांधकामावर नेल्याची चर्चा नागरिकामधून आहे.यापुर्वीही एका पोलिस नाईकने कारवाई न करता  बांधकामावर वाळू नेल्याची घटना ताजी असताना पुन्हा वाळूचा प्रकार घडल्याने मंगळवेढा पोलिस या ना त्या कारणाने सतत चर्चेत येत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. 
               पोलिस अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवर नियंत्रण नसल्यामुळे  गंभीर प्रकरणातील आरोपी कारागृहातून पळून जाणे,कारागृहातून बोकड पार्टीला आरोपीला घरी नेणे,वाळूची वाहने कारवाई न करता बांधकामासाठी घरी नेणे आदी घटना घडत असल्याचा नागरिकांतून आरोप होत आहे.यासाठी मंगळवेढयाला खमक्या पोलिस अधिकार्‍याची गरज व्यक्त होत आहे. त्या दोन पोलिसांच्या घटनेची चौकशी स्थानिक डी.वाय.एस.पी.कडे न देता करमाळा येथील डी.वाय.एस.पी.कडे देण्यात आल्याने निःपक्षपातीपणे चौकशी होण्याची शक्यत नागरिकांतून वर्तविली जात आहे. त्या दोन पोलिस कर्मचार्‍यांबाबत पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर बदलीचा आदेश अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेेंडे यांनी काढला असून  त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.
                  नव्याने जिल्हयाच्या कार्यभार स्विकारलेल्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे  पोलिस कर्मचार्‍यांबाबत तक्रार प्राप्त होताच त्यांनी पहिला कारवाईचा दणका मंगळवेढा पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांवर दिला असून  बेकायदा कामे करणे तसेच अवैध व्यवसायिकाशी हितसंबंध ठेवणार्‍या कर्मचार्‍यावर अधिकार्‍यांची करडी नजर आहे.दरम्यान, पोलिस शिपाई संदिप सावंत यापुर्वी वादग्रस्त झाल्याने त्याची उचलबांगडी मुख्यालयात करण्यात आली होती. मागील तीन महिन्यापुर्वीच तो मंगळवेढयात  दाखल झाला आहे.

Pages