अजित पवार, आदित्य ठाकरेंसह २६ कॅबिनेट मंत्री, १० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, December 30, 2019

अजित पवार, आदित्य ठाकरेंसह २६ कॅबिनेट मंत्री, १० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ....





 ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

मुंबई/प्रतिनिधी

         महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

         राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळं वळण देणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार दिवसांच्या सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं.

"मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री"
          उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात फक्त तीन महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीनं आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपावलं आहे. शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिलं नाही.

"यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ"
           अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, सतेज उर्फ बंटी पाटील, दत्तात्रय भरणे, बच्चू कडू, विश्वजित कदम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. 

Pages