डेंग्युच्या डासांचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा मुख्याधिकार्‍यांच्या दालनात डेंग्युचे डास सोडू :-गणेश अंकुशराव - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, November 20, 2019

डेंग्युच्या डासांचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा मुख्याधिकार्‍यांच्या दालनात डेंग्युचे डास सोडू :-गणेश अंकुशरावपंढरपूर/प्रतिनिधी
     पंढरीत सध्या डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. डेंग्यूच्या साथीने पंढरपूरकर हैरान आहेत; परंतु पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासन याबाबत ‘ढीम्म’च असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूच्या डासांचा फैलाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी जलद गतीने उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा आम्ही पंढरपूर नगरपरिषदेमधील मुख्याधिकार्‍यांच्या दालनामध्ये डेंग्युचे डास आणुन सोडू! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.पावसाळा संपल्यानंतर व कार्तिकी वारीनंतर पंढरपूर नगरपरिषदेने शहर व परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेणे अपेक्षीत होते; परंतु नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून यासंबंधी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. शहरातील अनेक ओपन स्पेसवर चिलारीच्या झाडांचे जंगल आढळून येत आहे. ठिकठिकाणी कचर्‍यांचे ढीग आढळून येत आहेत. सखल भागात साठलेल्या पाण्यामुळे दलदल झालेली आढळून येत आहे. अनेक गटारी तुंबलेल्या आहेत. ‘झाडु संतांचे मार्ग आणि करु पंढरीचा स्वर्ग’ हे ब्रीद वाक्य अभिमानाने मिरवणारी पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासन मात्र पंढरीत सर्वत्र पसरलेले हे घाणीचे व अस्वच्छतेचे साम्राज्य हटविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना राबवत नाही. नगरपरिषद प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे व अकार्यक्षमतेमुळे सध्या शहरातील नागरिकांच्या जीवीतास मात्र धोका निर्माण झाला आहे. डेंग्युने एका निष्पाप बालकाचा बळी घेतला तरी गेंड्याचे कातडे पांघरलेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना याच्याशी काहीही सोयरसुतक राहिलेले दिसुन येत नाही.
        पंढरपूर नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर जेंव्हापासुन पदावर विराजमान झाले आहेत तेंव्हापासुन त्यांनी कोणताही जनहिताचा मोठा निर्णय घेतलेला आढळुन आला नाही. नगरपरिषदेला कर भरणार्‍या करदात्या नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे तरीसुध्दा मानोरकर साहेब मुग गिळुन गप्प आहेत. मानोरकर साहेब नागरिकांना फक्त ‘खबरदारी’ घेण्यासंबंधी सुचना करताना आढळत आहेत. अहो साहेब पण पंढरीची स्वच्छता कधी करणार? असा संतापजनक प्रश्‍न आता नागरिक विचारु लागले आहेत. येत्या काही दिवसात नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर शहराची स्वच्छता मोहीम हाती घेतली नाही किंवा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या नाहीत तर आम्हाला नाईलाजाने मुख्याधिकार्‍यांच्या केबीनमध्येच डेंग्युचे डास धरुन आणुन सोडावे लागतील. अशी संतप्त प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

Pages