सी.आय.डी.कडे तपास वर्ग करण्याची मागणी,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा :- शेतकरी संघटना व महिला वर्गाची तक्रार.. - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 19, 2019

सी.आय.डी.कडे तपास वर्ग करण्याची मागणी,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा :- शेतकरी संघटना व महिला वर्गाची तक्रार..


मंगळवेढा/प्रतिनिधी

          " मंगळवेढा येथे तीन महिलांचे अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणातील तपास योग्य रितीने होत नसून हा तपास सी.आय.डी.कडे वर्ग करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा  महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना निवेदनाव्दारे दिला आहे
           मंगळवेढा शहरातील कुंभार गल्लीत मर्दा नर्सिंग होममध्ये अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी मागील महिन्यात छापा टाकून डॉक्टरसह अन्य दोन महिलांना अटक केली होती. तर या घटनेतील एका महिलेला उपचारासाठी सोलापूरातील  शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.अवैध गर्भपात प्रकरणातील तीन महिलांनी सोनोग्राफी कुठे केली याचा तपास न केल्यामुळे संबंधितांना आरोपी केले नाही. सोनोग्राफी करणार्‍याला वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असल्याचा आरोप देशमुख यांनी निवेदनात केला आहे. गर्भपात करण्यासाठी इंजेक्शन व गोळया कोठून आणल्या याचाही छडा पोलिस लावू शकले नाहीत. या सर्व महत्वाच्या मुद्दयामुळे भविष्यात आरोपीला जामीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तीन जीव जावूनही पोलिसांच्या तपासातील त्रुटीमुळे आरोपी न्यायालयातून निर्दोष होण्याची शक्यता निवेदनात नमूद केली आहे.या बेकायदा गर्भपात प्रकरणातील एजंटदारावरही कारवाई होणे अपेक्षित असताना तीथपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत.भूल दिलेल्या इंजेक्शनच्या रिकाम्या अँपूल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या जाळून टाकल्या आहेत.वेगवेगळया जिल्हयातून एजंटामार्फत पाठवून दिलेल्या महिलांच्या एजंटदारांना पोलिसांनी अदयापही आरोपी केले नाहीत. सध्या आरोपीची पोलिस कोठडी संपल्याने तो न्यायालयीन कोठडीत आहे.राज्यात स्त्री भ्रूण हत्येचा कायदा अस्तित्वात असताना केवळ अवैधरित्या गर्भपात केल्याचे कलम लावून पोलिसांनी आरोपीला  क्लिनचीट दिल्याचे म्हटले आहे.शासन राज्यभर मुली वाचवा अभियान व प्रसार एकीकडे करीत असताना     
              डॉ.मर्दा यांनी काळीमा फासण्याचे काम करून शासनाचा कायदा पायदळी तुडवला आहे.दरम्यान मंगळवेढयातील घडलेल्या घटनेचा तपास योग्य रितीने न झाल्याने हा तपास सी.आय.डी.कडे वर्ग करावा,राजकिय दबावाला बळी न पडता निःपक्षपातीपणे तपास करून भविष्यात कोणत्याही डॉक्टरने स्त्री  भ्रृण हत्या करण्याचे धाडस करू नये यासाठी पोलिस प्रशासनाने गांभिर्यपूर्वक तपास करून या घटनेची पाळेमुळे शोधून काढून आरोपीला जामीन होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तपास योग्य रितीने न झाल्यास दि 2 डिसेंबर रोजी शेकडो महिला व नागरिकांसह पोलिस निरिक्षक,मंगळवेढा यांच्या कार्यालयावर लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून या निवेदनावार प्रभाकर देशमुख यांच्यासह राजाभाऊ हबाळे,रघुनाथ चव्हाण,युवराज कोंडुभैरी,बाळासाहेब नागणे,युवराज घुले,आबा सावंजी,बिरू ढेकळे,अमोल माळी,सुधाकर कांबळे,सुशिला लोकरे,आरती लोकरे,शोभा करेली,मनिषा शिंदे,राणी शिंदे,छाया ढावरे,इंदूबाई चौगुले,सिताबाई सोलनकर,सारिका वगरे,कल्पना कांबळे,वैशाली उबाळे,स्वाती आवताडे,प्रमिला आवताडे,कल्पना खरबडे,सारिका डोके,शितल घोडके,सोनाबाई वाघमारे,अनिता तावस्कर,वंदना शिवशरण यांच्यासह मोठया संख्येने या निवेदनावर महिला वर्गाच्या सह्या आहेत.या निवेदनाच्या प्रती राज्यपाल,महाराष्ट्र राज्य,गृहसचिव,महाराष्ट्र राज्य,पोलिस उपमहानिरिक्षक कोल्हापूर,जिल्हाधिकारी सोलापूर,पोलिस अधिक्षक ग्रामीण सोलापूर,पोलिस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा आदींना  या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत

Pages