सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे मुख्य निवडणूक निरिक्षक विरेंद्र सिंग बंकावत - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, October 9, 2019

सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे मुख्य निवडणूक निरिक्षक विरेंद्र सिंग बंकावत



    पंढरपूर /प्रतिनिधी 

      विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे,आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी  काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक निरिक्षक विरेंद्र सिंग बंकावत यांनी दिल्या.                     
                 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील  राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
               या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली वाघमारे, स्वप्निल रावडे, न.पाचे मुख्याधिकारी अनिकेत महानोरकर यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते.  
                मुख्य निवडणूक निरिक्षक बंकावत  यावेळी बोलताना म्हणाले, आदर्श आचार संहितेच्या पालन सर्वांनी करावे. उमेदवारांनी  आवश्यक परवानगी घेवून सभांची जागा व  वेळ या बाबत स्थानिक पोलीस  प्रशासनाला आगोदर सूचना द्यावी.  सभेच्या ठिकाणी  निर्बंध किंवा  प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास  त्याचे पुर्णपणे पालन करावे. राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी पदयात्रा काढताना  वाहतूकीला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेवून वाहतूकीचे नियम पाळावेत.तसेच कोणत्याही पक्षांच्या कार्यकर्ते अथवा उमेदवारांनी  मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर आणू नये अशा सूचना ही  मुख्य निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी यावेळी दिल्या.
            उमेदवारांनी प्रचाराच्या वाहनांची परवानगी  दर्शनी भागावर लावावी, मतदानाच्या दिवशी मतदान स्लिपवर चिन्ह अथवा छायाचित्राचा वापर करु नये. उमेदवारांच्या बुथ प्रतिनिधींनी मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी चा वापर करु नये.  आदर्श आचार सहिंतेचे काटेकोरपणे पालन करुन कायदा व सुववस्था अबाधित राखावी अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी यावेळी दिल्या.
             यावेळी  राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीत मतदान करण्याची पध्दती, मतदान केंद्र
याबाबत काही शंका उपस्थित केल्या  या शकांचे निरसनही मुख्य निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी यावेळी केले. बैठकीत उमेदवारांना व उमेदवारांच्या प्रतिनिधींना सर्व निवडणूक विषयी माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Pages