माझा जन्म शेतकर्‍याच्या पोटी :- शरद पवार - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 18, 2019

माझा जन्म शेतकर्‍याच्या पोटी :- शरद पवारपंढरपूर/प्रतिनिधी

        मला संचालक मानतात यात माझी काय चूक आहे. मी गेलो नाहीतर बातमी होईल म्हणून मीच ईडीसमोर गेलो. त्यांना पत्र दिले. परंतू कायदा सुव्यवस्था बिघडेल असे अधिकारी सांगू लागले. त्यामुळे मी थांबलो परंतू आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही राज्यात मी दाखवतोच काय करायचे ते. 24 नोव्हेंबरला यांना लोकांचा मुड दिसेल. त्यामुळे निवडणूनंतर मी ‘ईडी’ला येडी करणार असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
          राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी चौकामध्ये जाहीर सभा घेतली. सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, लतीफ तांबोळी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, युवराज पाटील, सुभाष भोसले, अ‍ॅड. राजेश भादुले, संदीप मांडवे, किरण घाडगे, सागर यादव, अनिता पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, यापुर्वी पंढरपूरला अनेकदा आलो. पण आज काय वेगळेच चित्र दिसते. तुमचं ठरलय आहे असं दिसतय त्यामुळे निकाल नानाच्या बाजूने येणार  आहे. राज्यभरात आघाडीच्या सभांना मोठ्या संख्येने तरूणाई येत आहे. त्यामुळे बापासोबत आता पोरंही आमच्याकडे आले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणताय की निवडणुकीमध्ये दम नाही. मी कुस्तीगिर संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे राज्यासह देशात अनेक पैलवान तयार केले. त्यामुळे 24 तारखेला यांना लोकांचा मुड दिसेल. आम्ही आमच्या काळात राज्याचा नावलौकीक वाढविला. परंतू या सरकारने सर्व सामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर फसविण्याचे काम केले आहे. ज्यांच्या काळात 16 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. ते आता छत्रपतींचा खोटा इतिहास तयार करत असून शौर्याचा वारसा असलेल्या किल्ल्यांमध्ये छमछम व दारूअड्डी सुरू करत आहेत. आम्ही सदैव शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले. परंतू सध्याचे सरकार असंवेदनशील असल्यामुळे कारखनदारी वाढलेली नाही. पाच वर्षात अनेक कारखाने बंद पडले. निम्म्याहून अधिक आजारी पडले. 5 वर्षात सत्तेचा गैरवापर यांनी केला आहे. शासकीय यंत्रणा हाताशी धरून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरही धाड टाकण्याचे काम यांनी केले आहे. दिल्लीसोबत कसे लढायचे हे आम्हाला माहित आहे. परंतू राज्यात मी आता दाखवतोच. भारतनांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे सांगत शरद पवार यांनी भाजप सरकावर जोरदार हल्लाबोल केला.
याप्रसंगी अ‍ॅड. राजेश भादुले, राजाभाऊ गुंड-पाटील, सुमित शिंदे, सागर यादव, श्रीकांत शिंदे,समाधान फाटे, संदीप मांडवे, शुभांगी भुईटे, किरण घाडगे, अनिल अभंगराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर  या सभेप्रसंगी होलार, तेली समाजासह संभाजी बिग्रेड, आरपीआय, लोक कलावंत संघटना व अरूण कोळी यांनी भारतनाना भालके यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. सभेला मोठ्या संख्येने तरूणाईसह अबालवृद असल्यामुळे शिवाजी चौक हाऊसफुल्ल झाला होता. चौकातील आसपासच्या इमारतींवरही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे काही तास संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाल्याचे पहावयास मिळाले. सभेप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, किरण अवचर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

"आघाडीच्या मंत्रीमंडळात नाना मंत्री- सुशिलकुमार शिंदे
            शरद पवार व मी एकत्रच आहोत. कारण आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलेली मुले आहोत. आम्ही एकत्र येऊन कधी उचलून फेकतो हे अनेकांना कळतच नाही. राज्यातील भाजपा सरकार 10 दिवसात उलथून फेकू. भारतनाना हे आपल्या कर्तृत्वाने पुढे आलेले नेतृत्व आहे. शिवाजी काळुंगे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे नाना हेच आघाडीचे उमेदवार आहेत. आघाडी सरकार सत्तेवर आल्यास नानांना मंत्रीमंडळात घेतले जाईल. व त्याना नक्कीच माझी साथ असेल.

"मी जनतेच्या अंतकरणात- भारत भालके
      12 वर्षे परिवहन खाते होते. तेंव्हा रोजगार निर्मिती का केली नाही? एमआयडीसीला कोणी विरोध केला. सैनिकांचा अपमान कोणी केला हे सर्वांना माहित आहे. ईव्हीएमवर असलेला माझा फोटो पाहिला तर मी तुमचे लेकरू असल्याचे वाटतेय. पण यांचा फोटो मात्र देणेकरी असल्या सारखा वाटतो.  मी कुणाकडूनही कधी वर्गणी घेतली नाही. मुंड्या पिरगळून कुणाची जमीन लाटली नाही. कारण मी जनतेच्य अंतकरणात आहे.   

Pages