गणपत आबांचा राजकीय वारसदार ठरले भाऊसाहेब रूपनर.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, September 29, 2019

गणपत आबांचा राजकीय वारसदार ठरले भाऊसाहेब रूपनर....



सांगोला/प्रतीनिधी

सांगोला येथून तब्बल ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम करणारे आणि वय ९४ असलेले शेकापचे आ. गणपतराव देशमुख यांचा उत्तराधिकारी म्हणून भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित करण्यात आले.शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगोला विधानसभेसाठी भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित केले. त्यामुळे गेली काही दिवस गणपतराव देशमुखांचा वारसदार कोण ? हि प्रतीक्षा आता संपली आहे. असे असताना शेकापचा उमेदवार म्हणून गणपतराव यांच्या मुलाचे नाव चर्चेत असताना देखील एका कार्यकर्त्याची निवड केल्याने पक्षाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
    सांगोला विधानसभा मतदार संघाची ओळख हि आ.गणपतराव देशमुख अशी उभ्या महाराष्ट्राला झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीला उभे न राहण्याचा निर्णय आ.देशमुख यांनी घेतला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढले आणि विजयी झाले. आ.देशमुख यांनी ५५ वर्षे विधानसभेचे प्रतिनिधित्व सांगोला येथून केले. तब्बल ११ वेळा विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. १९७२ मध्ये कै.काकासाहेब साळुंखे-पाटील आणि १९९५ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी आ.देशमुख यांना पराभूत केले होते. हे दोन अपवाद वगळता १९६२ पासून ते या मतदारसंघातून अपराजित राहिले.
     यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी सुरवातीपासून निवडणूक लढण्याचा नाही असा निर्णय घेतला. काही दिवसापूर्वी कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठीक्त देखील कार्यकर्त्यांनी तुम्हीच निवडणूक लढा असा आग्रह आ.देशमुख यांच्या पुढे केला. मात्र वयाचे कारण पुढे करीत आ.देशमुख आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर रविवारी शेकापची बैठक सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत देखील गणपतराव यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. मात्र अखेर आ.गणपतराव देशमुख यांचा उत्तराधिकारी म्हणून भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित करण्यात आले.
     सांगोला विधानसभा मतदारसंघ हा आघाडीच्या मित्रपक्षापैकी एक म्हणून शेकापला सोडला जात होता. माढा लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य दिले होते. त्यावेळेस विधानसभेत राष्ट्रवादीने सहकार्य करण्याचे ठरले होते. मात्र आता आघाडीच्या जागावाटपात सांगोला कोणाकडे जाते हे महत्वाचे आहे. सध्या तरी सांगोल्यातून राष्ट्रवादीचे दीपक साळुखे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देवून मतदारसंघात प्रचाराला सुरवात केली. तर युतीमध्ये हि जागा शिवसेनेला सोडण्यात येते. त्यामुळे सेनेकडून आ.देशमुख यांचे निवडणुकीतील पारंपारिक विरोधक शहाजीबापू पाटील यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला आहे. तसेच भाजपाकडून श्रीकांत देशमुख,राजश्री नागणे इच्छुक आहेत. तसेच शेकापकडून गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख हे देखील इच्छुक होते.काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादा यांचे नाव पुढे केले होते.या शिवाय भाऊसाहेब रुपनर, नानासाहेब लिगाडे आदींची नावे चर्चेत होती. चंद्रकांत देशमुख यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. मात्र आजच्या बैठकीत भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित झाले. त्यामुळे आता गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांचा उत्तराधिकारी यांची निवड झाली.त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा शेकाप कि अन्य कोण विजयी होणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Pages