डाळिंब प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार: सहकार मंत्री - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 18, 2019

डाळिंब प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार: सहकार मंत्री


                              




  पंढरपुर /प्रतिनिधी   
                 
  देशात डाळिंब उत्पादकांची संख्या मोठ्या वाढत असल्याने बाजारात डाळिंबाची आवक वाढते त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी  मिळतो. त्यातून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. अशा फळांना बाजारात टिकण्यापेक्षा त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ केल्यास  निश्चित फायदा होईल. शेतकऱ्यांना डाळिंबावर प्रक्रीया उद्योग करण्यासाठी  शासनामार्फत आवश्यक मदत केली जाईल. असे प्रतिपादन सहकार, मदत व पुनवर्सन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 
     पणन व कृषि विभाग, अपेडा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर तसेच सोशल फांऊडेशन व ग्रीन होराईजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हर्षदा लॉन्स, सांगोला येथे डाळिंब मार्केटिंग, प्रक्रिया व उत्पादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोळत होते.
       यावेळी  कार्यक्रमास  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  बसवाराज बिराजदार,राष्ट्रीय डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा, अपेडाचे सहाय्यक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे, पणन विभागाचे उपसरव्यस्थापक प्रशांत सुर्यवंशी, उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र कांबळे, एन.आर.सी.पीचे शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड,  तालुका कृषि अधिकारी दिपाली जाधव उद्योजक अभिजीत पाटील, अंकुश पडवळे आदी उपस्थित होते. 
        यावेळी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, डाळिंबाचे उत्पादन होत आहे आणि देशातील बाजारपेठेची मर्यादा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात निर्यात तसेच डाळिंब प्रक्रिया उत्पादन करणे गरजेचे आहे. डाळिंबामध्ये अनेक औषधयुक्त गुणधर्म असल्याने डांळिबा पासून तयार केलेल्या ज्युस, तेल, पावडर आदी पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य  वापर करावा. यासाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याचबरोबर शेतकऱ्यांनी कृषि पर्यटन केंद्रे सुरु करावित तसेच जिल्ह्यातील डाळिंबाबरोबच सर्वच पिकांचे मार्केटींग होणे गरजेचे असल्याचे ही सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्याने पूरग्रस्त हरिपूर व चांदूर या  दोन गावांचे  पालकत्व घेतले असल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.
   जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने उपलब्ध पाण्याच्या वापर काटकसरीने करावा. डाळिंबाच्या पिकांसाठी शेततळे आवश्यक असून, कृषि विभागाच्या मागेल त्याला शेततळे, ठिंबक सिंचन योजनांचा लाभ घेवून मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घ्यावे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले.
  डाळिंब उत्पादकांनी डाळिंबाची ट्युशू कल्चर रोपांची लागवड करावी. त्यामुळे झाडांची वाढ लवकर होऊन त्यावर तेल्या रोगांवर नियंत्रण तसेच विविध रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.  डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना  भरघोस उत्पादन मिळते. राष्ट्रीय डाळिंब केंद्रामार्फत उत्पादकांना प्रशिक्षण वर्गाबरोबरच तसेच आवश्यक माहिती  दिली जात असल्याचे राष्ट्रीय डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी सांगितले.
  यावेळी डाळिंब क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान व जी.आय मानांकन प्रमाणपत्र वितरण सभारंभ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत म्हणून राजश्री नागणे यांनी 5 लाख रुपयांचा धनादेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सुर्पूत केला.   या कार्यशाळेस जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Pages