पोलिसांची दबंगगिरी काठी तुटेपर्यंत ग्रामपंचायत सदस्याला केली मारहाण गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी केले जातेय धरणे आंदोलन - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 17, 2019

पोलिसांची दबंगगिरी काठी तुटेपर्यंत ग्रामपंचायत सदस्याला केली मारहाण गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी केले जातेय धरणे आंदोलन
मंगळवेढा/प्रतिनिधी

नंदूर येथील विदयमान ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे यांचा  कुठल्याही घटनेचा संबंध नसताना विनाकारण काठी तुटेपर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी मारहाण  करून बुटाने लाथाडल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबीत करण्याच्या मागणीसाठी  दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचेसह नंदूर ग्रामस्थ धरणे आंदोलन करीत असून आज तिसर्‍या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते.
नंदूर येथे गावातील दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. यावेळी उपस्थित सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड यांच्यासह त्यांच्या पाच पोलिस कर्मचार्‍यांनी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे हे मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी जात असताना दि. 8 जून रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान काठी तुटेपर्यंत मारहाण केली.यावेळी बुटाच्या लाथाही घातल्याने ग्रामपंचायत सदस्याची मानहानी झाली आहे. तुटलेल्या सरकारी काठया ह्या पोलिसांनी जागेवरच टाकून दिल्या या काठया सबळ पुरावा म्हणून  गाडे यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर या मारहाणीत कानाला गंभीर मार लागल्याने जखम झाली असून कानाचे ऑपरेशनही करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार मंगळवेढा पोलिस ठाण्यात जखमी गाडे व त्यांचे कुटुंबीय देण्यास गेल्यावर ठाणे अंमलदार योगिराज खिलारे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड यांच्या सांगण्यावरून  तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप गाडे यांचा आहे. विनाकारण मारहाण व बुटाने लाथाडल्यामुळे  या ग्रामपंचायत सदस्याची मानहानी झाली आहे. या घटनेत पोलिसांनी एफ.आय.आर. नोंदवून घेवून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे गरजेचे होते.मात्र पोलिसांनी त्याउपर उपचाराला पाठविले उपचार करून आल्यानंतर मात्र  हे सर्व कर्मचारी पोलिस खात्यातील असल्यामुळे  फिर्याद  नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. परिणामी जखमी होवूनही गाडे यांना न्यायासाठी गेली दोन महिने झाले झगडावे लागते आहे. मंगळवेढा पोलिस या घटनेची दखल घेत नसल्याचे लक्षात येताच गाडे कुटुंबियांनी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी तेथील पोलिसांनी त्यांना पकडून पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्यासमोर प्रत्यक्ष उभे केले. यावेळी पोलिस अधिक्षकांनी या घटनेची विभागीय चौकशी केली जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर गाडे कुटुंबियांच्या मनाचे परिवर्तन झाल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा दिलेला इशारा तुर्त स्थगित केला. पोलिस अधिक्षकांनी शब्द देवूनही एक महिन्याचा कालावधी लोटला,अदयाप कुठलीही कारवाई नसल्याने अखेर गाडे कुटुंबियांना न्यायासाठी मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे हत्यार उपसावे लागले. या आंदोलनात जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, सरपंच दामू कांबळे,उपसरंपच परमेश्‍वर येणपे,सदस्य महादेव भोजने,तंटामुक्ती अध्यक्ष शंकर संगशेट्टी,सिध्दाराम मोसलगी,वडील विठ्ठल गाडे,आई कमल गाडे,भाऊ चंद्रकांत गाडे,चुलती शांताबाई गाडे,वहिनी  रेखा गाडे,उषा आठवले,सुनंदा बनसोडे,मिनाक्षी आठवले,विमल गंगणे,मल्लिकार्जून बगले,श्रीमंत आठवले,इरण्णा गाडे,महादेव आठवले,रेवाप्पा आठवले,सायबू रोकडे,सुखदेव डोरले,दामाजी मोरे,बाळासाहेब नागणे,आण्णा आसबे,राजेंद्र सावळे,शिवाजी कांबळे,मारुती भोरकडे,सुधाकर कांबळे,बलभिम माळी,आबासाहेब सावंजी,दत्तात्रय वरपे,मधूकर कोंडुभैरी यांचेसह ग्रामस्थ व जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले असून संबंधित कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल होवून निलंबीत केल्याशिवाय आंदोलन माघारी घेणार नसल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.

 नंदूर ग्रामपंचायत सदस्य गाडे यास विनाकारण  काठी तुटेपर्यंत मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जनहित  शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व नंदूर ग्रामस्थ पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना टिपलेले छायाचित्र.
2.पोलिसांनी काठया तुटेपर्यंत  मारहाण केल्याच्या ह्याच त्या काठया छायाचित्रात दिसत आहेत.

Pages