कुलगुरू डॉ. फडणवीस यांची चित्रे मनाला आनंद आणि प्रेरणा देणारे:पोलीस आयुक्त शिंदे.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 24, 2019

कुलगुरू डॉ. फडणवीस यांची चित्रे मनाला आनंद आणि प्रेरणा देणारे:पोलीस आयुक्त शिंदे..
तीन दिवस चालणार प्रदर्शन

सोलापूर/प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आपल्या व्यस्त वेळातून काढलेली सुंदर चित्रे मनाला आनंद आणि अनुभूती देणारे असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले. नवोदित कलाकारांना त्यांच्या चित्रांमधून प्रेरणा मिळते, असेही ते यावेळी म्हणाले.
    शनिवारी, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वतः आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या विविध प्रकारच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे, नंदिनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, लहानपणापासूनच चित्रे काढण्याची आवड होती. कुलगुरू झाल्यानंतरही वेळ मिळेल, तेव्हा चित्रे काढली. त्यात सोलापूर ही कलाकारांची भूमी असून येथे अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत. या कलाकारांच्या आग्रहाखातर गेल्या 35 वर्षापासून काढलेली विविध चित्रांचे प्रदर्शन आज येथे भरवले आहे. यामध्ये वारली, नेचर, पोट्रेट, स्कल्पचर, फिलामेंट आदी चित्रांचा समावेश आहे.
     पोलीस आयुक्त शिंदे म्हणाले, कलेमुळे एक वेगळी ऊर्जा मिळते, आनंद मिळतो आणि त्यातूनच पुढे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली कला जोपासली आहे. त्यांनी काढलेली चित्रे खुप सुंदर आहेत. यातून मनाला आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    ज्येष्ठ शिल्पकार रामपुरे म्हणाले, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सुंदर चित्रे काढली आहेत. अतिशय क्रिएटिव्हिटी त्यांच्यात पहावयास मिळतो. कलाकारांसाठी व्यक्त होणे फार महत्त्वाचे असते. आता त्यांनी विद्यापीठातही कला व ललित विभाग सुरू केल्याने अतिशय आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नंदिनी शिंदे यांनी कला जोपासल्याने जीवनात एक वेगळी मजा येते, असे सांगितले.
      उद्घाटन कार्यक्रमास गायक मोहम्मद अयाज, युवराज चुंबळकर, दत्ता सुरवसे, डॉ. बी. पी. रोंगे, सचिन खरात, कुलसचिव विकास घुटे, प्रा. महेश माने, अश्विनी चव्हाण, ऍड. अमोल कळके, विक्रम खेलबुडे, माधवी रायते, डॉ. व्यंकटेश मेतन यांच्यासह चित्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोज सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत चित्रप्रदर्शन पाहता येणार आहे.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोग यांनी केले तर आभार डॉ. माया पाटील यांनी मानले.
     चित्र विक्रीतील रक्कम पूरग्रस्तांसाठी
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात यंदा अतिशय पाऊस पडून महापूर आला. अनेक गावे उद्ध्वस्त झाली. खूप मोठा फटका या दोन्ही जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्तांसाठी काही चित्रांच्या विक्रीतून मिळालेला पैसा देण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
        सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे, नंदिनी शिंदे व अन्य.

Pages