मंगळवेढा पोलिस स्टेशनसमोर पोलिस अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू..... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 22, 2024

मंगळवेढा पोलिस स्टेशनसमोर पोलिस अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू.....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका ही संतांची भूमी म्हणून महाराष्ट्रात प्रचलित असताना या भुमीत वेश्या व्यवसाय, जुगार, गुटका, मटका, बेकायदा दारूविक्री, अवैध वाळू उपसा यात वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनू पहात असल्याने मंगळवेढा नगरीतील जेष्ठ नागरिकांसह विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस निरीक्षक रणजित माने हटाव या मागणीसाठी पोलिस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन गुरूवारपासून सुरू केले आहे. मंगळवेढयात 18 संत होवून गेल्याने राज्यात संतांची भुमी म्हणून या नगरीकडे पाहिले जाते. पो.नि.माने यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर दारू, मटका, जुगार, गुटखा, वेश्या व्यवसाय याला जोम चढला असल्याचे आंदोलनकर्त्यांची तक्रार असून त्यांची विभागीय चौकशी करून संबंधित अवैध व्यवसायाला जबाबदार धरून त्यांना निलंबीत करण्यात यावे. अशा घोषणा आंदोलकांनी दिल्यामुळे पोलिस स्टेशन परिसर दणाणून गेला आहे. मागील दोन आठवडयापुर्वी लेंडवे चिंचाळे परिसरातील ज्ञानेश्‍वरी लॉजवर सोलापूर पोलिस अधिक्षक कार्यालयातील पथकाने धाड टाकून परराज्यातील वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांची मुक्तता केली. सदर घटना ही मंगळवेढा पोलिस स्टेशन हद्दीत अनेक दिवसापासून सुरू असताना येथील जबाबदार अधिकारी व बीट धारकांना याची गुंजभर कल्पना कशी काय नव्हती? असा सवाल आंदोलकांकडून केला जात आहे. या वेश्या व्यवसायाला पाय फुटले असून कारखाना परिसरात या व्यवसायाने आता तेथे उच्छांद मांडला आहे. परराज्यातील एका बालकाचे अपहरण होवून सोळा महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप त्या मुलाला शोधण्यात स्थानिक पोलिसांना यश आले नसल्याने तो परराज्यातील असल्यामुळेच की काय तपासात भेदभाव केला जात असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. पो.नि.माने यांचा कार्यकाल संपूनही यांना कुठल्या आधारावर व कामगिरीवर येथे ठेवले आहे हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. संबंधित अधिकार्‍याविरूद्ध वारंवार कोल्हापूर आय.जी.कार्यालयासमोर आंदोलन करूनही त्यांना मुदतवाढ कशी काय दिली जाते ? लोकशाहीत न्याय आहे की नाही याबाबत जेष्ठ नागरिकांमधून सवाल केला जात आहे.
निंबोणी येथील कामू पाटील यांचा खून झाल्याचे त्यांच्या कुटुंबियाचे म्हणणे असतानाही त्या दिशेने तपास का केला जात नाही. पोलिस खाते नेमके या घटनेत कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या खुन प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई येथेे वेळोवेळी आंदोलन करूनही पाटील कुटुंबियांना अद्याप ही न्याय न मिळता न्यायाची टांगती तलवार कायम आहे. पो.नि.माने हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे असल्याने त्यांचे राजकीय पुढार्‍यांशी सलोख्याचे संबंध असल्याने बदली होवू नये यासाठी त्यांचा वापर करून घेत आहेत. पो.नि.माने यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांनी कर्तव्य विसरून अवैध व्यवसायाला पाठबळ दिल्याने त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नसल्याच्या भुमिकेवर आंदोलक ठाम असल्याचे दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे. यावेळी आंदोलनकर्ते खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्‍वर आवताडे, बठाणचे जेष्ठ नागरिक मधुकर बेदरे, शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील गटाचे सिद्धेश्‍वर हेंबाडे, दामाजी शुगरचे माजी संचालक संभाजी लवटे, निंबोणीचे सरपंच अ‍ॅड.बिरूदेव घोगरे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक धन्यकुमार पाटील, मनोज चव्हाण, उद्योजक दिलीप उगाडे, विजय भोसले, सागर वाघमारे, शंभू नागणे, जनहित शेतकरी संघटनेचे सर्जेराव गाडे, तालुका संपर्क प्रमुख नाना बिचुकले, रवि पवार, धनंजय पवार, ज्ञानेश्‍वर सातपुते, दादा बुरजे, आनंद माळी, पोपट भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे व विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिद्धेश्‍वर आवताडे मित्रपरिवाराचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनात 75 वर्षाचे जेष्ठ नागरिक ही यात सहभागी झाल्याने येणार्‍या -जाणार्‍या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे चौकशी करून जे चौकशीत निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. - शिरीषकुमार सरदेशपाडे, पोलिस अधिक्षक, ग्रामीण सोलापूर
आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिल्याने ते स्विकारले आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. - डॉ.अर्जून भोसले, डी.वाय.एस.पी., पंढरपूर विभाग

Pages