मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील कागदावर नसलेले पाणी प्रत्यक्षात उतरवण्याचे काम स्व.भारत नानांनी केले :- भगीरथ भालके
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अँड. राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे, अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून प्रलंबित प्रश्नावर योग्य तो न्याय न दिल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बी.आर.एस. पक्षाचे नेते भगीरथ भालके यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १३ प्रमुख मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाला बी. आर.एस. पक्षाचे नेते भगीरथ भालके यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी अजित जगताप, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड राहुल घुले,जिल्हाध्यक्ष युवराज घुले,तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, आबा खांडेकर,संदीप फडतरे, इसाक शेख,श्रीशैल्य हत्ताळी,मनोज खांडेकर आदीसह आंदोलक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना भालके म्हणाले,पिकविम्याबाबत महसूल मंडलमध्ये पावसाच्या आकडेवारीचा चुकीचा अहवाल सादर करून कंपनीशी संगणमत करुन देण्यात आला असून या अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालंतय हे तपासण्याची गरज आहे.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात शेवटच्या श्वासापर्यंत स्व.भारत भालके यांनी प्रयत्न केले. कागदावर नसलेले पाणी प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले असून व कागदावर आणले परंतु फटाके,गुलाल व फुले उधळणे,कलश पुजन या श्रेयवादाच्या घडामोडीत सर्वसामान्याची चेष्टा करण्याचे काम सध्या अधिकाऱ्याकडून सुरू आहे. या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे पाप देखील लोकप्रतिनिधीकडून सुरू आहे.

मंगळवेढा तालुक्यातील प्रश्नावर यापूर्वी समविचारी आघाडीच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनाला जनतेच्या प्रश्नाची जाणीव करून दिली परंतु अधिकारी काम करताना मस्तवालपणाने वागत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी आंदोलन करत नसून सार्वजनिक प्रश्नासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलनासाठी बसले आहेत त्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचे हत्यार या पुढील काळात उपसावे लागेल. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही. तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकऱ्याचे प्रश्न, मराठा आरक्षण असे प्रश्न सुटत नसेल तर सरकारला आमच्या दारापर्यंत येऊ देणार नाही. पंढरपूरची जनतेने ठरवल्यास मुख्यमंत्र्याला देखील पांडुरंगाचे पाय धरू दिले नाही हा इतिहास आहे.