मंगळवेढा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार;स्वस्त धान्य मिळण्यासाठी चक्क 80 वर्षाच्या वृध्द जोडप्याचे अर्धनग्न आंदोलन..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 27, 2023

मंगळवेढा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार;स्वस्त धान्य मिळण्यासाठी चक्क 80 वर्षाच्या वृध्द जोडप्याचे अर्धनग्न आंदोलन.....

मंगळवेढा तालुक्यातील रेशन दुकानदारांची मनमानी, लाभार्थ्यांची झोळी रिकामी.....
वृद्धावर आंदोलन करण्याची वेळ का आली?
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील 80 वर्षाचे वृध्द आनंदा निर्मळ व त्यांच्या पत्नी यांना रेशनचे धान्य गेल्या सहा महिन्यापासून अंगठा उमटत नाही या कारणास्तव देण्यास टाळाटाळ करीत असल्याने चक्क या वृध्द जोडप्यांनी तहसिलदार यांच्या दालनासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याची वेळ त्यांना आल्याने पुरवठा विभागाचा कारभार चव्हाटयावर आला असून वृध्दांच्या अर्धनग्न आंदोलनामुळे महसूलच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी सर्वच स्तरावरुन व्यक्त होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावचे वयोवृध्द आनंदा निर्मळ (वय 80) यांना गेल्या सहा महिन्यापासून मशीनवर अंगठा उमटत नसल्याचे कारण पुढे करुन त्यांना धान्य देण्याचे स्वस्त धान्य दुकानदार टाळत असल्याने या बाबतची तक्रार अनेक वेळा महसूलचे अधिकारी यांच्याकडे करुनही त्यांनीही दुर्लक्ष या वृध्दाकडे केल्याचा आरोप त्या आंदोलनकर्त्या कुटूंबियांचा आहे. प्रहार संघटनेचे राजकुमार स्वामी यांच्याकडे धान्य मिळत नसल्याची तक्रार त्या वृध्दाने केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच अर्धनग्न अवस्थेत या वृध्द जोडप्याने धान्य मिळावे या मागणीसाठी महसूल अधिकारी यांच्या दालनासमोर चक्क उंबर्‍यावर बसून आंदोलन केल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली व तात्काळ पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना बोलावून या वृध्दांच्या धान्याचा प्रश्न मार्गी लावा अशा कडक शब्दात पुरवठा विभागात काम करणार्‍या अधिकार्‍याचे कान टोचले. या वृध्द जोडप्यांना मुलगा संभाळत नसल्यामुळे त्यांचे जीवन रेशनच्या धान्यावरच अवलंबून असल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी सकाळी 11 वाजता ते वृध्द तहसिल कार्यालयात दोन वाजेपर्यंत थांबूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. आंदोलनास प्रारंभ करतास तात्काळ त्या घटनेची दखल घेण्यात आली. पुरवठा विभागाच्या या अंधाधुंद कारभाराबद्दल सर्व स्तरामधून संताप व्यक्त होत आहे. तेथील अधिकार्‍यांनी स्वस्त धान्य दुकानदारांशी चर्चा करुन प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना तसा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे निष्पन्न झाले. सध्या या पुरवठा विभागात झीरो कर्मचार्‍यांचा मोठा भरणा असून हे कार्यालय चक्क त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे मनमानी पध्दतीने कारभार सुरु असल्याच्या तिखट प्रतिक्रीया आहेत. तत्कालीन तहसिलदार स्वप्निल रावडे यांच्या कारकिर्दीत येथील कारभार स्वच्छ चालत असताना सध्या पुरवठा विभागाची अवस्था अशी का झाली? असा प्रश्न काम घेवून येणार्‍या नागरिकामधून विचारला जात आहे. ऑनलाईन रेशन बाबत नागरिकांच्या तक्रारी असून त्यांच्या तक्रारी न सोडविल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिला आहे.

Pages