नेटवर्क गायब होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 23, 2023

नेटवर्क गायब होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत....

मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात असलेले सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे काम थंडावले असून गोरगरीबांना धान्य वेळेत मिळणे दुरापास्त झाल्याने सर्व्हरचा वेग वाढवून द्यावा अशी मागणी कार्डधारकांतून होत आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात मोहिम राबविली. या मोहिमेत ज्या नागरिकांकडे कार्ड नव्हते त्यांनी पुरवठा विभागात येवून फॉर्म भरुन कार्ड काढले, मात्र ऑनलाईन नोंदणी मध्ये जवळपास 3 हजार कार्डधारक सर्व्हर अभावी नोंदणीच्या प्रतिक्षेत असल्याचे पुरवठा निरिक्षक पाटील यांनी सांगितले. रेशन कार्डाचे ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय स्वस्तधान्य दुकानदाराकडून गहू, तांदूळ आदी माल कार्डधारकांना मिळू शकत नाही.
ऑनलाईन नंबर मिळाल्यानंतर कार्डधारकांना मशीनवर नंबर जाण्यास 45 ते 50 दिवस कालावधी लागतो. तद्नंतर अंगठा उमटल्यानंतरच शासकीय धान्य योजनेचा लाभ मिळतो. परिणामी सर्व्हरचे काम दिल्ली येथील एन.आय.सी. मार्फत चालत असून याला गती नसल्याने व अधूनमधून बंद पडत असल्यामुळे कामकाजावर याचा परिणाम होत आहे. परिणामी याची कपॅसिटी वाढविल्यानंतरच कामाला गती मिळणार आहे.

Pages