मंगळवेढा/प्रतिनिधी
आंधळगाव येथे एका ढाब्याच्या पाठीमागे बसून बेकायदा दारू विक्री करणार्या अड्डयावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 7 हजार रुपये किमतीची दारू जप्त करून सलीम रमजान इनामदार(वय 28) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांच्या आदेशाने मंगळवेढा तालुक्यातील अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.25 रोजी बोराळे नाक्यावर असताना खबर्यामार्फत त्यांना आंधळगाव येथील संगम ढाब्याच्या पाठीमागे वरील आरोपी हा देशी विदेशी दारूची चोरून विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच सदर पथकाने सायंकाळ 5.25 वा. छापा टाकला असता त्यावेळी 1260 रुपयांच्या 7 रॉयल स्टॅग,3520 रुपये किमतीच्या 22 मॅगडॉल नंबर 1 च्या बाटल्या,1650 रुपये किमतीच्या 11 इंम्पिरिअल ब्यु कंपनीच्या बाटल्या,700 रुपये किमतीच्या 10 देशी संत्रा दारू बॉटल अशा एकूण 7 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.याची फिर्याद पोलिस हवालदार प्रकाश काटकर यांनी दिली आहे.

नुतन पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी अवैध धंदयावर कारवाई करण्याचे फर्मान काढल्याने स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवेढयात कारवाई केली आहे.मंगळवेढा शहर परिसरात मोठया प्रमाणात धाब्यावरून दारूची विक्री होत असल्याचे चित्र असून काही धाबे निव्वळ दारूसाठी फेमस असल्याची चर्चा आहे.
चक्क जेवणाचा बोर्ड लावून आत बेकायदेशीरपणे दारू विक्रीचा व्यवसाय उघडपणे होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.सध्या दारू उत्पादन शुल्क यांनीही कारवाईची मोहिम जिल्हयात सुरु केली असून धाब्यावर दारू पिणार्याला मोठया प्रमाणात दंडही आकारले आहेत.मंगळवेढयात अदयापही या विभागाची कारवाई झाली नसल्याने येथे कारवाई कधी होणार? असा सुज्ञ नागरिकांचा सवाल दारू उत्पादक विभागाला होत आहे.या कारवाईकडे तमाम सुज्ञ नागरिक नजरा लावून आहेत.