मंगळवेढा येथील नूतन डी.वाय.एस.पी. इमारतीची पोलिस अधिक्षकांनी केली पाहणी - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 28, 2022

मंगळवेढा येथील नूतन डी.वाय.एस.पी. इमारतीची पोलिस अधिक्षकांनी केली पाहणी

मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या डी.वाय.एस.पी.कार्यालय इमारतीची नुतन पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांनी धावती भेट देवून पाहणी केली.दरम्यान ही इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिक वारी दरम्यान उदघाटन होण्याची शक्यता चर्चिली जात आहे. नवीन तहसील कार्यालय परिसरात कै.भारत भालके यांच्या अथक परिश्रमातून येथे डी.वाय.एस.पी.कार्यालय मंजूर करून इमारत उभारणीचे काम सुरु होते.दरम्यान, निधी अभावी जवळपास गेल्या दहा वर्षापासून बांधकाम रेंगाळत पडले होते. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या निधीमध्ये इमारतीचे पूर्ण काम होवू न शकल्यामुळे उर्वरीत काम बाकी होते. यासाठी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व जिल्हा नियोजन समिती सदस्य अजीत जगताप यांनी प्रयत्न करून जवळपास साडे 19 लाख रुपयांचा निधी मिळवून इमारतीचे काम रंगरंगोटीसह पूर्ण केले असून ती उदघाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने गुरुवारी नुतन पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांनी इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून ते पंढरपूर येथे कार्तिक वारीच्या नियोजन बैठकीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये एकंदरीत डी.वाय.एस.पी.च्या कार्यालयासह अन्य 10 खोल्या आहेत.सध्या ही इमारत पूर्ण होवून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे.इमारतीस रंगरंगोटी केल्याने एक वेगळा लूक प्राप्त झाला आहे. सध्याचे डी.वाय.एस.पी.कार्यालयाचे कामकाज शहरातील जुन्या पोलिस स्टेशनमध्ये अपुर्‍या जागेत चालत आहे.दरम्यान,मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्याचे कामकाज पाहता ही इमारत अपुरी होती. सध्याची इमारत प्रशस्त व हवेशीर,सभोवताली मोकळे मैदान व मोठया प्रमाणात झाडी आहे.ही झाडी तत्कालीन डी.वाय.एस.पी.दिलीप जगदाळे यांनी लावली होती. हे वृक्ष आज मोठे झाल्याने इमारतीची शोभा वाढली आहे.या इमारतीसाठी तत्कालीन डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनीही परिश्रम घेतले होते.
विदयमान डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी जातीने लक्ष देवून स्वतः थांबून शेवटच्या टप्प्यातील इमारतीचे काम पुर्ण करून घेतले आहे.दरम्यान पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांचे भेटीप्रसंगी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने व पोलिस कर्मचारी उपस्थित होते

Pages