मंगळवेढा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने लावली हजेरी सरासरी 11.25 मिमि पावसाची नोंद...... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, May 14, 2022

मंगळवेढा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने लावली हजेरी सरासरी 11.25 मिमि पावसाची नोंद......

मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट करीत वादळी वार्‍यासह हजेरी लावली. दरम्यान विजांचा कडकडाट अतिमोठयाने झाल्याने अक्षरशः जमीन व घरे हादरत असल्याने नागरिक भयभीत झाल्याचे चित्र होते.या दरम्यान वीज पडल्याने मंगळवेढा परिसरातील एक म्हैस व सोड्डी परिसरातील एक गाई अशी दोन जनावरे मृत्यूमुखी पडली. या पावसाची सरासरी 11.25 मि.मि.इतकी महसूल खात्याकडे नोंद झाली आहे. मागील दोन महिने अतिउष्णता जाणवत असल्यामुळे संपूर्ण वातावरण उष्ण झाले होते. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण तयार होवून गुरुवारी मध्यरात्री अचानक विजांचा कडकडाट करीत पावसाला प्रारंभ झाला. या दरम्यान पावसापेक्षा विजा कडकडण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या आवाजाने घरे व जमीन हादरत असल्याचा अनुभव काही नागरिकांनी कथन केला. या दरम्यान त्यामधील वीज मंगळवेढा परिसरातील तुकाराम दिवसे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हैस जागेवर मृत्यूमुखी पडली. दुसरी घटना सोड्डी येथील अडक्याप्पा येडके यांनी बांधलेल्या खिलार गायीच्या अंगावर वीज पडल्याने तीही मृत्यूमुखी पडली. मागील दोन आठवडयापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने वीज पडल्याने एकंदरीत तीन जनावरे मृत्युमुखी पडली होती. या नैसर्गिक घटनांचा फटका पशुपालकांना बसला असून तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठयांना दिले आहेत.
सर्वात जास्त पाऊस बोराळे मंडलमध्ये म्हणेजच 21 मि.मि.पडला तर सर्वात कमी मारापूर मंडलमध्ये 5 मि.मि. इतका पडला आहे.शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे सुर्यदर्शन मंगळवेढेकरांना झाले नाही.पडलेल्या पावसामुळे हवेतील उष्णता कमी झाल्याने नागरिकांची उकाडयापासून काही अंशी सुटका झाली. यंदाच्या हंगामात फेब्रुवारी महिन्यापासून सूर्य आग ओकत असल्याने यंदाचा उन्हाळा नागरिकांच्या आठवणीत कायमस्वरूपी राहणार असल्याची चर्चा होत आहे. या प्रखर उष्णतेचा त्रास नागरिकांसह मुक्या प्राण्यांना व पिकांनाही झाला आहे. प्रखर उष्णतेमुळे ऊसासारखी पिकेही करपून त्यावर गाभा नावाचा रोग पडत आहे. या रोगामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
मंडलनिहाय पडलेला पाऊस-मंगळवेढा मंडल -6 मिमि,मारापूर -5 मिमि,मरवडे - 7 मिमि बोराळे -21 मिमि,हुलजंती -8 मिमि,भोसे - 19 मिमि,आंधळगांव -12 मिमि,पाटखळ -12 मिमि असा एकूण 90 मिमि म्हणजेच 11.25 मिमि पावसाची नोंद झाली आहे.मंगळवेढा तालुक्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेली म्हैस व गाय छायाचित्रात दिसत आहे.

Pages