मंगळवेढा आगारातील सहा कर्मचार्‍यांना बेकायदा संपात सहभागी झाल्याने कारवाईच्या नोटीसा.. - Divyaprabhat News

Breaking News

Friday, November 12, 2021

मंगळवेढा आगारातील सहा कर्मचार्‍यांना बेकायदा संपात सहभागी झाल्याने कारवाईच्या नोटीसा..

 

दिव्य न्यूज नेटवर्क

             मंगळवेढा आगारातील कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून पाच चालक व एक वाहक अशा सहा कर्मचार्‍यांना एस.टी.महामंडळाच्या आगार प्रमुखांनी कारवाईच्या  नोटीसा बजावून  पंधरा दिवसाच्या आत खुलासा मागविला आहे.

               मंगळवेढा आगारातील काही चालक,वाहकांना दि.3 नोव्हेंबर रोजी डयुटी लावली होती. ते कर्तव्यावर न येता व प्रशासनास कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता गैरहजर राहून दि.4 पासून नियमबाह्य काम बंद आंदोलन करून आगारातील इतर कर्मचार्‍यांना कामबंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी चिथावणी देवून स्थानिक राजकीय लोकांना हाताशी धरून आगाराचे गेट बंद करून गेटसमोर बसून बसेसची आडवणूक केली.त्यामुळे आगारातून बसेस मार्गस्थ होण्यास अडथळा निर्माण झाला.तसेच न्यायालयाने संप अवैध ठरवून प्रतिबंधात्मक अंतरीम आदेश पारित केला असतानाही कर्मचार्‍यांनी बेकायदेशीर संप सुरु ठेवला असल्याने महामंडळाला दिवाळी वाहतूक करता आली नाही. त्यामुळे महामंडळाची आर्थिक हानी झाली आहे. तसेच प्रवाशांचीही गैरसोय झाल्याचे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करून पंधरा दिवसाच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत खुलासा न आल्यास गैरहजेरीत एकतर्फी  निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.

           मंगळवेढयात खाजगी वाहतुकीला ऊत-गेली पंधरा दिवस विनाथांबा कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने याचा परिणाम एस.टी.वर झाला असून  ,एकही एस.टी.आगारातून बाहेर पडत नसल्यामुळे याचा गैरफायदा खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी मोठया प्रमाणात घेत असल्याचे चित्र आहे.दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 वा. मंगळवेढा ते पुणे जाण्यासाठी एकाच वेळी सात मिनी ट्रॅव्हल्स खचाखच मेंढरे कोंबल्याप्रमाणे प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याने अपघात घडल्यास याला कोण जबाबदार? असा सवाल करून यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्‍न जनतेतून विचारला जात आहे.आर.टी.ओ. व वाहतूक शाखेचे पोलिसही यावर मूग गिळून गप्प असल्याने अशा वाहतूकीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.एस.टी.ला मंगळवेढा ते पुणे 350 रुपये तिकीट असताना खाजगी ट्रॅव्हल्सवाले 500 रुपये घेत असल्याने अक्षरशः प्रवाशांची डोळयादेखत लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.

             कॅबीनमध्ये चालकाशिवाय अन्य व्यक्तींना बसण्यास परवानगी नसतानाही खाजगीवाले कॅबीनमध्ये प्रवासी बसवून वाहतूक  करीत असल्याचे चित्र आहे
Pages