हुलजंती यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर जुगारअड्डा व बेकायदा दारू साठयावर डी.वाय.एस.पी.ची कारवाई... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, October 31, 2021

हुलजंती यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर जुगारअड्डा व बेकायदा दारू साठयावर डी.वाय.एस.पी.ची कारवाई...

 


 या छाप्यात 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,9 जणांविरूध्द गुन्हे दाखल


मंगळवेढा/प्रतिनिधी 

                    हुलजंती येथील श्री महालिंगराया यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी हॉटेल लक्ष्मी पॅलेसजवळ मन्ना जुगार खेळणार्‍या अड्डयावर व अवैध देशी विदेशी दारू साठा करून विक्री करणार्‍या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून जवळपास 2 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करून 9 जणांविरूध्द गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान,ही कारवाई पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  

               

                   पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,हुलजंती येथे श्री महालिंगरायाची यात्रा लवकरच दिपावली दरम्यान भरत असल्याने या यात्रेला प्रतीवर्षी लाखो भाविक कर्नाटक व महाराष्ट्रातून येत असतात.या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांना हुलजंती येथे  दि.30 ऑक्टोबर रोजी हॉटेल लक्ष्मी पॅलेसच्या आडोशाला काही इसम मन्ना नावाचा जुगार  52 पानावर खेळत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले,पोलिस नाईक सुनिल मोरे,अभिजीत साळुंखे,पोलिस शिपाई संतोष चव्हाण,चालक पोलिस सुनिल तानगावडे,पोलिस शिपाई राजाराम घुमरे यांच्या सहाय्याने त्यांनी सदर ठिकाणी सायंकाळी 4.00 वा. छापा टाकला. यावेळी यातील आरोपी सुरेश जंगमशेट्टी,मायाप्पा बंडगर,श्रीकांत पेटरगी,सहदेव रोंगे (हुलजंती),महादेव सांगोलकर(पौट),मुदगौडा पाटील,बापुराया पाटील,सिदराया चौगुले(रा.जंगलगी) असे एकत्र गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी घटनास्थळावरून 88 हजार 200 रोख रक्कम व 27 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण 1 लाख 15 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसर्‍या घटनेत हॉटेल लक्ष्मी पॅलेसमध्ये अवैध देशी विदेशी दारूचा साठ करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर हॉटेलची झडती घेतली असता 1 लाख 49 हजार 400 रुपये किमतीच्या देशी दारू संत्रा आयकॉन 51 बॉक्स,1600 रुपये किमतीचे मॅगडॉल 10 सिलबंद बाटल्या,1350 रुपये किमतीच्या इंपिरिअल ब्ल्यु कंपनीच्या 9 बाटल्या असा एकूण 1 लाख 52 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक अभिजीत साळुंखे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर  पोलिसांनी मायाप्पा धोंडाप्पा मल्लाळे (रा. हुलजंती) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

              श्री.महालिंगराया यात्रेच्या तोंडावर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते व अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षात पहिलीच मोठी कारवाई झाल्याने अवैध व्यवसाय करणार्‍यामध्ये खळबळ उडाली असून या कारवाईमुळे प्रामुख्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

             हुलजंती येथे अवैध दारूसाठा जप्त प्रसंगी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,महिला पोलिस नाईक वंदना आयरे,पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले,पो.ना.सुनिल मोरे व अन्य पोलिस कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत.






Pages