मतदार संघातील ऊसतोडणी कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार :- आ.समाधान आवताडे - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, June 5, 2021

मतदार संघातील ऊसतोडणी कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार :- आ.समाधान आवताडे

 

प्रतिनिधी/मंगळवेढा

            आपल्या उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व संसाराचा गाडा हाकण्यासाठी पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील अनेक कुटुंबे स्थलांतर करतात. अशावेळी हे कामगार विकासाच्या व शासनाच्या विविध योजना प्रवाहापासून कोसो दूर राहतात.याच बाबीची दखल घेऊन अशा कुटुंबांना विकासाची व योजनांची विविध कवाडे खुली व्हावीत यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

                महाराष्ट्रातील मराठवाडा हा ऊसतोडणी कामगारांचा विभाग परिचित आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर - मंगळवेढा तालुका हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे व रोजगाराची इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही तालुक्याच्या विविध भागातील जवळपास १५ हजार  ऊसतोड कामगार  ऊसतोडी रोजगार करून आपली उपजीविका पूर्ण करीत आहेत.परंतु ऊसतोडणी कामगारांसाठी शासनाच्या अनेक सुविधा व सवलती असूनही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोड  कामगारांच्या मुलांच्या आरोग्य,शिक्षण,सुविधा अनुषंगाने शाळा वसतिगृह व शैक्षणिक साहित्य या बाबींवर सुद्धा विशेष लक्ष देऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

           शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक, परभणी आणि जळगांव या ऊसतोड कामगारांचे जिल्हे यादीत सोलापूरचाही समावेश करून ज्याप्रमाणे वरील जाहीर जिल्ह्यात स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळ अंतर्गत भगवान बाबा वसतिगृह मार्फत सुविधा दिल्या जाणार आहेत.  अगदी त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात सुद्धा अशी योजना सुरु होणे गरजेचे आहे. कारण वर्षातील साधारणपणे ५ ते ६ महिने हे कामगार घरापासून ऊसतोडणी कामा निमित्त विविध ठिकाणी जात असतात अशावेळी राहण्याची अथवा खाण्याची सोय होत नसल्यामुळे अनेक मुले शाळेला मधूनच रामराम करून आपल्या पालकांसमवेत निघून जातात. 

         ...त्यामुळे त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडून त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते.त्याचबरोबर योग्य व पोषक आहाराअभावी ऊसतोड कामगारांची अनेक मुले निरनिराळ्या आजरांना बळी पडत आहेत. तसेच या मुलांना माता बालसंगोपणाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुपोषित बालकांची संख्यासुद्धा जास्त आहे. त्यामुळे अशा मुलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी आरोग्य खात्याअंतर्गत ० ते ५ वयोगटातील लसीकरण, साथीच्या आजारावर योग्य औषधोपचार आदी गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अनेक ऊसतोड कामगार गावावर वास्तव्यास न राहिल्यामुळे त्यांच्या रेशन वितरणाचा प्रश्न सुद्धा व त्यांचा विमा आणि इतर शासन सुविधा प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांच्या रेशन वाटपाचे योग्य नियोजन करून ते त्यांच्या रेशन लाभापासून वंचित राहणार नाहीत यासाठी सुद्धा आपण शासनदरबारी पाठपुरावा करणार आहोत असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.

          आ.समाधान आवताडे यांनी सुनील जाधव, दामाजी बंडगर, अशोक शिंदे, दादासाहेब लेंडवे, वसंत लेंडवे, शेती आधिकारी रमेश पवार, पंडीत गायकवाड, बाबू नांगरे, दामोदर रेवे, जगन्नाथ इंगळे आदी आधिकारी व ऊसतोड मुकादम यांच्याशी विचारविनिमय करून संबंधित योजना कार्यवाही विषयी चर्चा केली.यावेळी दामाजी शुगर कार्यकारी संचालक मा.झुंजार आसबे, संचालक मा.भारत निकम, मा.विजय माने,दगडू फटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pages