अधिवेशन संपताच विज वितरणने कृषी पंपाचे विद्युत डी.पी.सोडविण्यास केला प्रारंभ..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, March 12, 2021

अधिवेशन संपताच विज वितरणने कृषी पंपाचे विद्युत डी.पी.सोडविण्यास केला प्रारंभ.....

 

ब्रम्हपुरी येथे 33 के.व्ही.मध्ये शेतकर्‍यांचा विजेसाठी ठिय्या


दिव्य न्यूज नेटवर्क

             मंगळवेढा येथील विज वितरण कंपनीने  ग्रामीण भागातील शेती पंपाचे थकित विज बिलापोटी अधिवेशन संपताच डी.पी.सोडविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले असून गुरुवारी भिमा नदीकाठावरील गावातील डी.पी.ऐन उन्हाळयात सोडविल्याने  शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान,ब्रम्हपुरी येथील 33 के.व्ही. उपकेंद्रात शेतकर्‍यांनी ठिय्या मांडल्याने  विज वितरणच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

           


                अधिवेशन सुरु होण्यापुर्वी मंत्री महोदयांनी शेतकर्‍यांची विज थकित बिलापोटी कापली जाणार नाही अशी घोषणा करून वाहवा मिळविली होती. हे अधिवेशन दि. 10 रोजी संपताच मंगळवेढा येथील विज वितरणच्या अधिकार्‍यांनी  विशेष फर्मान काढून  भिमा नदीकाठावरील गावातील कृषी पंपाचे वीज डी.पी.सोडविण्याचे काम गुरुवारी दिवसभर सुरु होते. परिणामी कुठलीही पूर्वसूचना न देता डी.पी. सोडविल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला.पिकांना पाणी देणारे शेतकरी विजेची वाट पहात शेतातच थांबले. शेतकर्‍यांनी 33 के.व्ही.उपकेंद्राकडे अधिक चौकशी केली असता थकित बिलापोटी डी.पी.सोडविण्याचे काम सुरु असल्याचे समजले.यानंतर शेतकर्‍यांनी आपला मोर्चा 33 के.व्ही. उपकेंद्राकडे वळवून कार्यालयात भाजपचे जिल्हा चिटणीस सिध्देश्वर कोकरे,सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील,आनंद पाटील,प्रमोद पुजारी,नवनाथ पुजारी,भारत पाटील,संजय पाटील,राजेंद्र पुजारी,रामभाऊ निलकंठ,सचिन पाटील,रामभाऊ रणे आदी शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला.बिल भरा,अन्यथा विज मिळणार नाही असा सूर  विज वितरणच्या अधिकार्‍यांचा होता. 

            साखर कारखान्यांनी डिसेंबरपासून गाळपास गेलेल्या ऊसाची बिले अदयापही दिली नसल्यामुळे आम्ही कोठून बिले भरणार असा सवाल शेतकरी मंत्री महोदय व अधिकार्‍यांना करीत आहेत.साखर कारखान्याची बिले काढून दया,आम्ही फुल ना फुलाची पाकळी भरण्यास तयार असल्याच्या भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या.सध्या उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.पिकाच्या लागवडीवर शेतकर्‍यांनी बँंका,पतसंस्था यांच्याकडून लाखो रुपयांची कर्जे घेवून आत्तापर्यंत पिके जोपासली असून ही पिके उष्णतेच्या तीव्रतेने जळून आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

               मध्यंतरी सलग तीन ते चार महिने पाऊस पडल्याने कृषी पंप बंद स्थितीत असतानाही विज वितरणने याचा विचार न करता सलग बिले दिली आहेत.काही शेतकर्‍यांची  5 एच.पी.चे कृषीपंप असताना त्यांना तिप्पट आकारणी करत 15 एच.पी.ची बिले देण्याचा अदभूत प्रकार विज वितरणने केला आहे. विज बिले भरल्याशिवाय विज बिल कमी केले जाणार नसल्याचा अधिकार्‍यांचा सूर आहे. तर शेतकर्‍यांनी चुकीची बिले भरणे कितपत योग्य आहे. असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.शेतकरी वर्ग कुटुंबासह शेतामध्ये रहावयास आहेत. विज बंद केल्यामुळे कुटुंबियांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

    ब्रम्हपुरी 33 के.व्ही. उपकेंद्रात कृषी पंपाची  विज तोडल्याने कार्यालयात ठिय्या मांडल्याचे छायाचित्रात दिसत आहे.Pages