अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट :-ॲड.यशोमती ठाकूर... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 12, 2020

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट :-ॲड.यशोमती ठाकूर...


महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय जारी...


दिव्य न्यूज नेटवर्क 

      एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे;त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अँँड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

           

 राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका,88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.

            मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचविला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.

            

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानातही घरोघरी जाऊन महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहेअसेही मंत्री अँँड. ठाकूर म्हणाल्या

Pages