शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे हद्दपार करा,आढावा बैठकीत आ.भारत भालके यांचे पोलिस प्रशासनास फर्मान.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, September 29, 2020

शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे हद्दपार करा,आढावा बैठकीत आ.भारत भालके यांचे पोलिस प्रशासनास फर्मान....

 

दिव्य न्यूज नेटवर्क

          जनतेची कामे विनाविलंब करून प्रशासन लोकाभिमुख करा,गोरगरीबांना  कोरोना कालावधीत स्वस्त धान्य पुरवठा व्यवस्थितरित्या झाला पाहिजे.शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे तात्काळ बंद झाले पाहिजेत.दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटगिरीचा सुळसुळाट तात्काळ थांबवावा आदी मुद्दयांवरून आ.भारत भालके यांनी विविध विभागातील अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरून सुधारणा न झाल्यास  प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल असा सज्जड इशारा  आढावा बैठकीत दिला.

               

आ.भारत भालके यांनी सर्व विभागातील अधिकार्‍यांची मंगळवेढा तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते.कोरोना कालावधीत गोरगरीबांना स्वस्त धान्य माल मिळाला का याबाबत त्यांनी  पुरवठा विभागाकडे चौकशी करून  कोणीही या धान्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आ.भालके यांनी केल्या. दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट वाढला आहे. पुनर्वसनाचा एजंटामार्फत तात्काळ दस्त नोंदणी केली जात असून शेतकर्‍याच्या कामाला मात्र विलंब लावला जात असल्याचा आरोप करीत आ. भालके यांनी दुय्यम निबंधक सांगळे यांना  यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत वरिष्ठांना कळवून कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.

         प्रांताधिकारी कार्यालयात महामार्गाच्या कामासाठी एजंटगिरी मोठया प्रमाणात वाढली असल्याची खंत आ. भालके यांनी व्यक्त करून एजंटगिरी बंद करण्याची सक्त सूचना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांना केली.येड्राव सजेचे  कोतवाल सचिन सांगळे हे वाळू हप्ते वसूल करीत असल्याबाबत आ.भालके यांनी बैठकीत मुद्दा मांडून  यापुढे प्रशासनात असा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा तहसीलदार स्वप्नील रावडे यांना दिला.कोतवाल सचिन सांगळे याला प्रशासनाने निलंबीत केल्याचे यावेळी  तहसीलदार यांनी  सांगितले.एस.टी.महामंडळाकडे 48 बस असून लंाब पल्ल्याच्या गाडया सुरु आहेत.मात्र ग्रामीण भागात बसेस सुरु झाल्या नसल्याची माहिती प्रभारी आगार प्रमुख रणे यांनी दिली.पंचायत समितीकडे 3257 घरकूल मंजूर असून 2500 घरकूल पुर्ण आहेत तर 661 घरकुलांचे बांधकाम अदयापही चालू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

            मंगळवेढा शहरात जुगार अड्डे व दारू धंदे असे 11 बेकायदा अवैध व्यवसाय सुरु असल्याचा प्रश्‍न आ. भालके यांनी पोलिस निरिक्षक गुंजवटे यांना करून आपला अवैध व्यवसायावर अंकुश नाही का? असा प्रश्‍न उपस्थित केला. यापुढे शहर व ग्रामीण भागातील अवैध व्यवसाय हद्दपार झाले पाहिजेत.पोलिस नाईक गजानन पाटील याने अवैध वाळूसाठा करूनही आपण का कारवाई केली नाही याचा अहवाल लेखी स्वरूपात मला कळवा असे आ.भालके म्हणाले. कोरोना कालावधीत 412  मोटर सायकली  जप्त केल्याचे सांगण्यात आले.

             ग्रामीण भागात खाकी एजंटांची संख्या वाढली आहे. हे एजंट गावागावात जावून भांडणे लावण्याचा उद्योग करीत आहेत.पोलिस स्टेशनला आल्यानंतर हे खाकी एजंटवाले तोडपाणी करून भांडणे मिटवून मालामाल होत असल्याने यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा सज्जड इशारा आ. भालके यांनी देवून नूतन पोलिस अधिक्षकांकडे कारवाईबाबत अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.

          दारू उत्पादन विभागाचे अधिकार्‍यांना  दारू धंदयावर कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिल्या.दक्षिण भागामध्ये दारूचे अड्डे वाढल्याने गोरगरीबांचे संसार रस्त्यावर येत आहेत.दरम्यान,कारवाई करून अवैध दारू विक्री थांबविण्यात यावी असे आ. भालके म्हणाले.चोखामेळा ग्रामपंचायत एवढी मोठी असताना  ग्रामविस्तार अधिकारी नेमण्याऐवजी ग्रामसेवक कोणी नेमला यावर पंचायत समितीकडून बी.डी.ओ.ने नेमल्याचे सांगण्यात आले.शिक्षण विभागाकडून शालेय  पोषण आहार,पुस्तके वाटप, गणवेशाची माहिती जाणून घेतली.विदयार्थी याच्यापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर अंगणवाडीबाबतही माहिती जाणून घेतली असता 53 अंगणवाडयांना इमारतीच नसल्याचे स्पष्ट झाले.

                पंचायत समिती कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली तालुक्यात 103 खते व बियाणे दुकाने असून सध्या युरिया खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.खताची जादा दराने विक्री होणार नाही यावर लक्ष ठेवून चोरांना अभय न देता शेतकर्‍यांच्या पाठीशी रहा असा सल्ला आ. भालके यांनी कृषी विभागाला दिला.याच बरोबर अन्य विभागातील कामाचा आढावाही आ.भालके यांनी घेतला. तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालय येथील अधिकार्‍यांना यापुढे कोरोना  रुग्णावर काळजीपूर्वक उपचार करा. एकही रूग्ण बाहेर पाठविता कामा नये,प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा तत्पर ठेवा अशा सूचना आ.भालके यांनी केल्या.सकाळी 11.00 वा. सुरु झालेली बैठक दुपारी 2.30 वा. संपली.अनेक महिन्यानंतर सर्व अधिकार्‍यांनी ही बैठक  घेतल्यामुळे आ. भालके काय माहिती विचारणार याबाबत अधिकार्‍यांना घाम फुटला होता. काही अधिकारी आपल्या विभागाची माहिती देण्यास अपयशी ठरल्याने आ. भालके यांनी त्यांना चांगलेच झापले

     मंगळवेढा येथे शासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेताना आ. भारत भालके,प्रांताधिकारी उदयसिंह भोसले,तहसीलदार स्वप्नील रावडे छायाचित्रात दिसत आहेत.



Pages