कोरोना विषाणूच्या महामारीत सामान्य जनतेला पंढरपूर अर्बन बँकेचा आर्थिक आधार..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, June 5, 2020

कोरोना विषाणूच्या महामारीत सामान्य जनतेला पंढरपूर अर्बन बँकेचा आर्थिक आधार.....





 पंढरपूर/प्रतिनिधी 
      कोरोना विषाणू लॉकडाऊन काळात मागील २-३ महिने समाजातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसल्याने हातावर पोट असलेले कामगार व लहान व्यावसायिकांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने घेतला असून यासाठी जवळपास 200 कोटी रूपयांचे कर्ज वितरणाची तरतूद या कर्जासाठी केली असल्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
     लॉकडाऊन नंतर जवळपास अडीच ते तीन महिन्यानंतर व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने कर्ज घेतल्यानंतर पहिले तीन महिने कर्जफेडीचे हप्ते भरून घेतले जाणार नाहीत. यानंतर कर्ज घेणार्‍यांकडून रोजच्या रोज व्यवसायाच्या ठिकाणी अथवा घरातून बँकेतर्फे प्रतिनिधी नेमून पैसे घेवून जातील. कर्जफेडीसाठी तीन ते पाच वर्षाची मुदत देण्यात आली आहे. छोट्या व्यवसाय करणार्‍यांकडून रोजच्या रोज कर्जाचे पैसे भरून घेतल्याने व्याज ही कमी प्रमाणात बसते. यासाठी दहा हजार रूपयांचे कर्ज घेणार्‍यांसाठी जनता आत्मसन्मान योजना तर पन्नास हजार रूपयांपर्यंतच्या कर्जासाठी आत्मसन्मान योजना आणण्यात आली आहे.
        जनता आत्मसन्मान योजनेत सर्व घटकांसह घरेलू कामगारांचा ही समावेश करण्यात आला आहे. रस्त्यावर बसून लहान मोठे उद्योग करणार्‍यांपासून ते घरोघरी जावून काम करणार्‍यांना हे कर्ज तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी पन्नास हजार रूपये कर्ज घेतल्यास याचा हप्ता पन्नास रूपयांच्या आसपास राहिल. बँक हे पैसे गोळा करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी वसुली प्रतिनिधी नेमणार असून कर्जाच्या व्याजातील तीन ते चार टक्के रक्कम त्यांना पगार म्हणून दिली जाणार आहे. याच बरोबर प्रत्येक कर्जदाराचा विमा काढला जाणार आहे.
   
   पंढरपूर अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर असून सर्वच शाखांमध्ये ही योजना लागू असणार आहे. या बँकेचे सर्वाधिक ग्राहक व सभासद हे सोलापूर जिल्ह्यात येथे जास्तीत जास्त कर्जपुरवठा केला जाईल. ही कर्ज तीन अथवा पाच जणांचा ग्रुप करून ती पुरविली जातील तसेच छोटे कर्जदार एकमेकांना तारण राहतील. कर्ज देताना रिझर्व्ह बँकेचे नियमही पाळावे लागत असल्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक म्हणाले. कर्ज घेणार्‍यांना व्यावसायिकांना बँकेने आकर्षक छत्र्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे ते व्यवसाय करतात तेथे ऊन, पाऊस यामुळे रक्षण होईल. बँकेने समाजातील सर्व घटकांचा विचार करून या योजना आणल्या आहेत. यात सर्व व्यवसायांचा समावेश आहे. ज्याला गरज आहे त्याने कर्ज मागणी करावी.
याच बरोबर लॉकडाऊनच्या काळात बँकेने अत्यावश्यक सेवेअंतर्गत जी दुकाने उघडी होती त्यांच्या दुकानात सुरक्षिततेच्या कारणास्तव बँकेने कॅश गोळा करण्याचे काम केले. रोजच्या रोज बँकेची गाडी प्रत्येक ठिकाणी जावून पैसे घेवून येत होती. या काळात बँकेने या व्यापार्‍यांना आरटीजीएस तसेच एनइएफटी आदि बँकिंग सेवा मोफत पुरविली आहे.
              मोठ्या व्यावसायिकांसाठी ही बँकेने योजना आणली असून पूर्वीचे कॅशक्रेडिट असणार्‍यांच्या ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांच्या पूर्वीच्या कर्ज रकमेच्या दहा टक्के अथवा २५ लाख पर्यंत कर्ज मर्यादा वाढवून दिली जात आहे. बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही पैसा उपलब्ध करून देण्यासाठी मागील महिनाभरापासून योजना दिली असल्याचे परिचारक म्हणाले.
            पंढरपूर अर्बन बँक ही शंभर वर्षाहून अधिक काळ पंढरपूर व परिसरात काम करत असून येथील लहान मोठ्या व्यापार्‍यांना व सर्वच घटकांना अर्थपुरवठा या संस्थेने केला आहे. आता कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत येथील सर्वच घटकांना सहकार्य करण्याचे धोरण बँकेच्या संचालक मंडळाने घेतले आहे. यापूर्वीही बँकेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त, गारपीट, दंगल, दुष्काळी भाग अशा अनेक ठिकाणी मदत केली आहे.
       यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन दिपक शेटे, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधेसरव्यवस्थापक भालचंद्र जोशी, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



Pages