अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 14, 2020

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली...




सुशांतच्या मृत्यूने दु:खी झालेले मोदी म्हणाले...
 दिव्य न्यूज नेटवर्क 
          बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.
    
            
“सुशांत सिंग राजपूत… एका अतिशय प्रतिभावान, उमद्या आणि तरूण अभिनेत्याने खूप लवकर जगाचा निरोप घेतला. टिव्ही मालिका आणि चित्रपटांतील त्याचा अभिनय खूप चांगला होता. मनोरंजन जगतात त्याने स्वत:च्या परिश्रमाने नाव मिळवलं. तो खूप जणांसाठी प्रेरणास्थान होता. तो अनेक आठवणी मागे ठेऊन गेला आहे. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती”, असे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.
   
 सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. रविवारी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यानाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याला ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
           दरम्यान, सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Pages